लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी ३५३९ पशुधनाचे वंधत्व निवारण
By हरी मोकाशे | Published: December 7, 2023 06:57 PM2023-12-07T18:57:12+5:302023-12-07T18:57:48+5:30
लातूर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे.
लातूर : दूध उत्पादन वाढविण्यासाठी तसेच भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २६० गावांत शिबीरे घेण्यात आली. त्यात ३ हजार ५३९ पशुधनांवर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे. त्यात प्रजननक्षम पशुधनाची संख्या २ लाख ४१ हजार ४८ अशी आहे. दरम्यान, सन २०२१- २२ मधील आकडेवारीनुसार दररोजची प्रति व्यक्तीसाठीची राज्यातील दूध उपलब्धता ही ३१५ ग्रॅम आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्यातील प्रति दिन प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता ही १२९ ग्रॅमने कमी आहे. तसेच भाकड जनावरांची संख्याही अधिक आहे. दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारणे म्हणजे त्यांच्यातील वंध्यत्व होय. राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायी- म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाअंतर्गत तपासणी, उपचार
राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक पशुधन तपासणी व उपचार शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २६० गावांमध्ये शिबीर घेण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ५३९ भाकड जनावरांची तपासणी करण्यात येऊन वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित गावांत येत्या १९ डिसेंबरपर्यंत शिबीर घेण्यात येणार आहेत.
अडीच लाख जनावरे प्रजननक्षम
जिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय पशुधन संख्या ५ लाख १३ हजार असली तरी सध्या त्यातील २ लाख ४१ हजार ४८ जनावरे प्रजननक्षम आहेत. सध्याचा कालावधी हा पशुधन गाभण राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिबिरादरम्यान, भाकड जनावरांची तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी अभियानपूर्वी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे.
२१ दिवसानंतर पुन्हा तपासणी...
शिबिरादरम्यान पशुधनावर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर पुन्हा २१ दिवसांनी या जनावरांची तपासणी करण्यात येणार आहे. तेव्हा सदरील पशुधन गाभण राहिले की नाही, हे पाहून आणखीन उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी आणि भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.
- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.