धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चाकुरात दोन तास रास्ता रोको
By हरी मोकाशे | Published: October 11, 2023 06:59 PM2023-10-11T18:59:05+5:302023-10-11T18:59:45+5:30
अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा
चाकूर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी चाकुरातील जुने बसस्थानकासमोर दोन तास आंदोलन करण्यात आले.
चाकूर तालुका धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आली नाही. घटनेतील तरतुदीप्रमाणे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
धनगर समाजाला जोपर्यंत अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही. आपण निवडून दिलेल्या राज्यातील आमदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करावी, असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले.
यावेळी गणेश हाके, ॲड. माधवराव कोळगावे, गंगाधर केराळे, दयानंद सुरवसे, शिवाजी देवकत्ते, दिनकर बडुरे, अशोक करडिले, लहू कोरे, नारायण राजुरे, लिंबराज केसाळे, संभाजी बैकरे, अमर देवकत्ते, ॲड. ज्ञानोबा हाके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजाच्या वतीने नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांना निवेदन देण्यात आले. प्रास्ताविक सुरेश शेवाळे यांनी केले. आंदोलनात तालुक्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.