साठवण तलाव ओसंडू लागले, मत्स्यबीज वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:24+5:302021-09-02T04:43:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जळकोट : दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जळकोट : दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकत सिंदगी हे साठवण तलाव भरुन ओसंडू लागले आहेत. यामुळे त्यातील मत्स्यबीज वाहून गेल्याने मत्स्य व्यावसायिकांवर नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
डोंगरी तालुका असलेल्या जळकोट तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून साठवण तलाव बांधले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरली होती. मध्यंतरीच्या कालावधीत २० ते २५ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सोनवळा, करंजी, हळद वाढवणा, केकतसिंदगी, माळहिप्परगा व अन्य काही साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत.
या तलावांमध्ये मत्स्य व्यावसायिकांनी मत्स्यबीज सोडले होते. तलाव भरुन वाहू लागल्याने तलावात सोडलेले छोटे-छोटे मत्स्यबीज वाहून गेले आहे. त्यामुळे भविष्यात साठवण तलावात मासे राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा, वांजरवाडा, जगळपूर, गुत्ती क्रमांक १, २, सोनवळा, करंजी, सिंदगी, माळहिप्परगा, डोंगरगाव, जंगमवाडी, शेलदरा, चेरा, धोंडेवाडी, ढोरसांगवी, जळकोट आदी गावांमध्ये मोठे तलाव आहेत. त्यांचा वापर मत्स्य व्यावसायिक करतात. मात्र, पावसामुळे मत्स्यबीज वाहून गेल्याने या व्यावसायिकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
शासनाने अनुदान द्यावे...
मत्स्यबीज वाहून गेल्याने संकट निर्माण झाले आहे. शासनाने यासाठी अनुदान द्यावे, जाळी द्यावीत. साठवण तलावाच्या परिसरात घरे बांधून द्यावीत, त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी जय मल्हार मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, जीवन गायकवाड, श्रीहरी पाटील दळवे, नामदेव विराळे, उस्मान शेख, नामदेव ठाकरे आदींनी केली आहे.