उत्तरपत्रिकेत लिहिली आर्ची-परश्याची 'सैराट' कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:35 AM2019-06-09T07:35:36+5:302019-06-09T07:36:16+5:30
विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत असंदर्भीय काही लिहिले तर ती उत्तरपत्रिका शिक्षकांना नियामकाकडे द्यावी लागते़
लातूर : दहावी बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार आणि कॉपी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे़ मात्र अभ्यास न झालेले काही विद्यार्थी आता कॉपी न करता उत्तरपत्रिकेत असंदर्भीय लिखाण करू लागले आहेत़ दरवर्षी अशी दुर्मीळ, पण मजेशीर प्रकरणे समोर येतात़ यंदाही एकाने आर्ची-परश्याची अख्खी सैराट कथा उत्तरपत्रिकेत लिहून काढली़
विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत असंदर्भीय काही लिहिले तर ती उत्तरपत्रिका शिक्षकांना नियामकाकडे द्यावी लागते़ त्यांच्याकडून बोर्डाच्या चौकशी समितीकडे सदर प्रकरण येते़ त्यानुसार समितीने उत्तरपत्रिकेची पडताळणी केली़ एकाही प्रश्नाचे उत्तर लिहिले नव्हते़ जे काही लिहिले ते सैराट होते़ अन्य एका परीक्षार्थ्याने उत्तरपत्रिकेत स्वत:चा संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर लिहिला़ गतवर्षी एकाने अख्खी उत्तरपत्रिका जय श्रीराम़़़ जय श्रीराम़़़ लिहून संपविली होती. मंडळाच्या नियमानुसार उत्तरपत्रिकेवर मोबाईल क्रमांक लिहून संपर्क करण्याचा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, पेपर तपासणी करणाऱ्यास धमकावणे, उत्तीर्ण करण्यासाठी विनवणी करणे, असे काही लिहिल्यास एक अथवा दोन परीक्षांसाठी अपात्र ठरविण्यात येते़ परंतु, सैराट कथा लिहिणाºया विद्यार्थ्याने उत्तीर्ण होण्यासाठी संपर्क अथवा धमकी, विनवणी असे काहीही केले नाही़ त्यामुळे त्याला ‘त्या’ एका विषयापुरतेच नापास करण्यात आले आहे़ दरम्यान, त्या विद्यार्थ्याला इतर पेपरमध्ये किती गुण मिळाले हे समजू शकले नाही़