स्वखर्चातून सव्वादोन किलोमीटरच्या रस्त्याचे केले मजबुतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:03+5:302021-09-02T04:44:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हरंगुळ बु. : दोन वर्षांपासून हरंगुळ बु. हद्दीतील वेगवेगळ्या चार ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हरंगुळ बु. : दोन वर्षांपासून हरंगुळ बु. हद्दीतील वेगवेगळ्या चार ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून या रस्त्याचे काम मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे गावातील बालाजी कैले यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून सव्वादोन किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हा रस्ता मंजूर करण्यात आला असल्याचे सातत्याने जिल्हा परिषद सदस्य सांगत आहेत. मात्र, दोन वर्षांत प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने मुरुम टाकून डागडुजी केली होती. मात्र, पुन्हा पाऊस झाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. ही समस्या पाहून गावातील बालाजी कैले यांनी स्वखर्चातून सव्वादोन किलोमीटरच्या रस्त्यावर मुरुम टाकून रोलरच्या सहाय्याने दबई करुन घेतली आहे. हरंगुळ ते महिला तंत्रनिकेतन व हरंगुळ ते अतिरिक्त एमआयडीसी बार्शी रोड या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचा ७० हजारांचा खर्च झाला आहे.
या कामाची देखरेख सरपंच सूर्यकांत सुडे, शाम बरुरे, मधुकर येरमे, उपसरपंच संतोष शेळके, पंचायत समिती सदस्य अरविंद सुरकुटे, राम बिर्ले, संभाजी जटाळ, चंद्रकांत खटके, किशन माळी, बालाजी मद्दे, सुनील कांबळे, जीवन कैले, अमोल पनाळे, राजू आयलाने आदी करत आहेत. रस्त्याचे मजबुतीकरण होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.