जलजीवन मिशनअंतर्गत अडीच वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यात केवळ १९९ नळयोजनांचे बळकटीकरण!
By हरी मोकाशे | Published: May 29, 2024 05:04 PM2024-05-29T17:04:31+5:302024-05-29T17:06:56+5:30
जलजीवन मिशनच्या कामातील स्थानिक पातळीवर अडचणी सुटेनात
लातूर : जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात नळयोजना बळकटीकरणाची ८०७ कामे मंजूर करण्यात आली. अडीच वर्षांचा कालावधी उलटला असतानाही केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नळयोजना कधी पूर्ण होणार अन् पिण्यासाठी शुध्द व पुरेसे पाणी कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
प्रत्येक घरास दररोज ५५ लिटर शुध्द पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गतची सर्व गावे आणि वाडी- ताड्यांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी योजनेअंतर्गत नळयोजना बळकटीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास अडीच वर्षांपूर्वी ८०७ कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाने जवळपास ६५० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, आतापर्यंत केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत.
औसा तालुक्यात सर्वाधिक कामे पूर्ण...
तालुका - काम पूर्ण
अहमदपूर - २९
औसा - ४३
चाकूर - २०
देवणी - ०४
जळकोट - ०५
लातूर - १५
निलंगा - ३४
रेणापूर - १७
शिरुर अनं. - ०९
उदगीर - २३
एकूण - १९९
आठ योजनांना प्रारंभच नाही...
जलजीवन मिशनअंतर्गतच्या आठ नळ योजना बळकटीकरणाच्या कामांना अद्यापही प्रारंभच झाला नाही. त्यात औसा तालुक्यातील १, देवणी- ४, शिरुर अनंतपाळ- २ आणि उदगीर तालुक्यातील एका योजनेचा समावेश आहे. या योजना सुरु व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने सातत्याने सूचना करण्यात येत आहेत.
स्थानिक राजकारणाने योजनेमध्ये व्यत्यय...
जलजीवन मिशनअंतर्गतच्या विहिरीसाठी तसेच जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जागा उपलब्ध झाली नाही. परिणामी, ८ योजनांची कामे सुरु झाली नाही. त्यामुळे अद्यापही कामाचा श्रीगणेशा झाला नाही.
० टक्के काम - ०८
२५ टक्के - ११७
५० टक्के - १८०
७५ टक्के - १९८
९९ टक्के - १०५
१०० टक्के - १९९
तहसीलदार, बीडीओंनी जागेचा तिढा सोडवावा...
जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विहीर, जलकुंभासाठी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही. तसेच ज्या ठिकाणचे जलस्त्रोत कोरडे पडले आहेत, त्या ठिकाणचे सर्वेक्षण करुन नवीन जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
संबंधित गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाई...
जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. वेळेत काम न करणाऱ्या गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. तसेच काही गुत्तेदारांना काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे.
- उदय देशपांडे, उपकार्यकारी अभियंता.