लातूरमध्ये कडकडीत बंद; लांबपल्ल्याच्या बसेस आगारातच
By संदीप शिंदे | Published: September 2, 2023 02:33 PM2023-09-02T14:33:33+5:302023-09-02T14:34:09+5:30
जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद : बसअभावी प्रवासी ताटकळले
लातूर : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली. सोबतच एसटी महामंडळाच्या वतीने लांबपल्ल्याचा गाड्या शनिवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
लातूर शहरात सकाळी १० वाजता मराठा क्रांती माेर्चासह समाजबांधवांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैठक झाली. यामध्ये लातूर बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे गंजगोलाई, दयानंदगेट परिसर, गांधी चौकासह विविध भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत आवाहनाला प्रतिसाद दिला. शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होती. दरम्यान, महामंडळाने शनिवारी लांब पल्ल्याच्या विविध मार्गावरील बसेस बंद ठेवल्या. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. तसेच विविध शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी दिली.
मराठा समाजबांधवांची दुचाकी रॅली...
लातूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बैठक झाल्यावर लातूर बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. तसेच रेणापूर येो कडकडीत बंद पाळण्यात आला. तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे आडत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.