वेतनश्रेणीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By आशपाक पठाण | Published: December 18, 2023 06:36 PM2023-12-18T18:36:39+5:302023-12-18T18:37:11+5:30

कर्मचारी विविध मागण्यांसाठी तीन दिवस काम बंद आंदोलनावर आहेत.

Strike by Gram Panchayat employees to demand pay scale | वेतनश्रेणीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

लातूर : नगरपालिका, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करावी, निवृत्ती वेतन देण्यात यावे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवर लादलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने लातूर पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे, विभागीय अध्यक्ष नवनाथ नरवडे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन झाले. कर्मचारी विविध मागण्यांसाठी तीन दिवस काम बंद आंदोलनावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीजपुरवठा, कर वसुली, लिपिकाचे काम करणारे अनेक कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत वसुलीची अट लादण्यात आली आहे. ती रद्द करावी, कर्मचाऱ्यांना उपदान लागू करावे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करण्यात यावी, सुधारित किमान वेतन लागू करावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात ग्रामपंचायत कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण ठाकूर, गोविंद लोभे, शिवाजी पवार, दिगांबर यमाजले, अमोल गायकवाड, अर्जुन जाधव, नरेश निंबाळकर, गोविंद गायकवाड, भागवत गरड यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

थकित वेतन तत्काळ अदा करावेत...
जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून एकूण रिक्त पदांच्या १० टक्के प्रमाणे वर्ग-३ व ४ च्या पदावर नियुक्ती करावी, सुधारित वेतन १० ऑगस्ट २०२० पासून थकित असलेले वेतन अदा करण्यात यावे, जिल्हा परिषद शाळेत आठवड्यातून तीन दिवस सफाई काम करण्याचे कर्मचाऱ्यांना दिलेले आदेश तत्काळ रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी तीन दिवस संप केला जाणार असल्याचे कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे यांनी सांगितले.

Web Title: Strike by Gram Panchayat employees to demand pay scale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.