गुन्हेगारांना झटका; 'एमपीडीए' अंतर्गत सराईत गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई, वर्षभर जेलची हवा
By राजकुमार जोंधळे | Published: August 11, 2023 06:08 PM2023-08-11T18:08:05+5:302023-08-11T18:08:13+5:30
लातूर जिल्ह्यात सराईत गुंडाला वर्षभर जेलची हवा !
लातूर : जिल्ह्यातील कासारशिरसी (ता. निलंगा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुंडाला वर्षभरासाठी 'एमपीडीए' कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. कुख्यात गुंडाविरुद्ध करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे. डीगंबर उर्फ दिगंबर विठ्ठल दगदाडे (वय २५) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी, भाईगिरीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरु केलेल्या मोहिमेमधील ही तिसरी कारवाई असून, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडाचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात, सराईत गुंड, भाईगिरी करणारे, अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून, त्यांचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कासारशिरशी ठाण्यामार्फत महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत डीगंबर उर्फ दिगंबर विठ्ठल दगदाडे याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची दिनांक लातूर जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
जिल्ह्यातील विविध ठाण्यात
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल...
कुख्यात गुंड डीगंबर उर्फ दिगंबर विठ्ठल दगदाडे याच्याविरुद्ध लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यासह कासारशिरशी ठाण्यात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करुन दहशत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र वापरणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
काय आहे 'एमपीडीए'
कायदा आणि तरतूद..?
महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ, पायरसी) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.