शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप
By हरी मोकाशे | Published: June 12, 2023 01:05 PM2023-06-12T13:05:17+5:302023-06-12T13:05:44+5:30
डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली.
जळकोट : तांड्यावरील मुलांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण करुन आकाशाला गवसणी घालणारे स्वप्न साकार करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणाऱ्या भवानीनगर तांडा (ता. जळकोट) येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची प्रशासकीय बदली झाली. या बदलीमुळे शिक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही गहिवरले. पुष्पवृष्टी करीत विद्यार्थी व पालकांनी या दोन्ही शिक्षकांना निरोप दिला.
जळकोट तालुक्यातील सुल्लाळी ग्रामपंचायतीअंतर्गत भवानीनगर तांडा आहे. येथे १७ जून २०१० रोजी जिल्हा परिषद शाळा सुरु करण्यात आली. या शाळेवर सहशिक्षक म्हणून जिल्हा बदलीने नरसिंग सुरेकर व बालाजी वाड हे आले. डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली.
एका छोट्याशा खोलीत भरणाऱ्या शाळेसाठी टुमदार इमारत लोकवर्गणीतून उभारली. तसेच शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे येण्याचा ओढा वाढला. शिवाय, पालकांनाही आपली मुले शिकू लागली आहेत, याचा मोठा आनंद झाला. तांड्यावरील मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन स्पर्धा परीक्षेची तयारीही करुन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलांची गुणवत्ता वाढली.
या शिक्षकांनी आत्मियतने आणि तन्मयतेने अध्यापनाचे कार्य केल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये आपुलकी निर्माण होऊन जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. दरम्यान, या दोन्ही शिक्षकांची प्रशासकीय बदली झाल्याचे समजताच मुलांसह पालकांना धक्का बसला.
सहशिक्षक नरसिंग सुरेकर व बालाजी वाड हे आता कार्यमुक्त होणार असल्याने रविवारी गावकऱ्यांनी या दोन्ही शिक्षकांची गावातून मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी फुलांच्या पायघड्या घालून पुष्पवृटी करीत डोळ्यांतून अश्रू वाहत मोठ्या जड अंत:करणाने निरोप दिला. यावेळी शिक्षकांच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते. यावेळी गणेश राठोड, विश्वनाथ राठोड, सुभाष राठोड, वसंत राठोड, विजय राठोड, शिवाजी राठोड, रमेश राठोड, राहुल राठोड, राजाराम मामा राठोड, सोपान राठोड, किशन राठोड आदींची उपस्थिती होती.
आमचे लाडके गुरुजी चालले...
शाळेतील सर्व मुलांना सहशिक्षक नरसिंग सुरेकर व बालाजी वाड यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता. रविवारी निरोप समारंभानंतर मुले आमचे लाडके गुरुजी चालले, असे डोळ्यांतून अश्रू वाहत सांगत होते. काही मुले तर गुुरुजी तुम्ही येथून जाऊ नका, अशी विनवणी करीत होते. त्यामुळे गुरुजीही गहिवरले होते.