विद्यार्थ्यांचे लक्ष ‘नीट’, ‘जेईई’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 05:50 AM2019-05-29T05:50:17+5:302019-05-29T05:50:20+5:30
बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे
लातूर : बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे. तुलनेने कला, वाणिज्यची घसरण कमी आहे.
बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेषत: गेल्या काही वर्षात विज्ञान शाखेचा घसरणाऱ्या निकालामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हींची ग्रुपिंग होईल इतपतच ध्येय ठेवून एनईईटी व जेईई मेन अॅडव्हॉन्सच्या तयारीकडे अधिक लक्ष देत आहेत.
शिवाय, उपरोक्त परीक्षांसाठी एनसीईआरटीच्याच पाठ्यपुस्तकांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पाठ्य पुस्तकांकडे
विद्यार्थी तुलनेने दुर्लक्ष करतात. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत ग्रुपिंग करण्यासाठी बोर्डाची तयारी करायची आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करायचे, हा पायंडा निर्माण झाल्याचे वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे अभ्यासक प्रा. डी.के. देशमुख व प्रा.दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले.
राज्य मंडळानेही आपल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलले. ज्यामध्ये आॅब्जेक्टिव्ह आणि बहुपर्यायी प्रश्न कमी करण्यात आले. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांसाठी अवघड होती. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे.
>कला शाखा स्पर्धा परीक्षेच्या दिशेने
बारावी कला शाखेची परीक्षा दिल्यानंतर डी.एड्. प्रवेश महत्त्वाचा होता. परंतु, अलिकडच्या काळात शिक्षक भरतीवरील बंदी व अन्य कारणांमुळे डी.एड्. महाविद्यालयातील जागा रिक्त राहू लागल्या. त्यामुळे बारावी कला शाखेतील स्पर्धा कमी झाली. आता केवळ पदवी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानेच कला शाखेकडे ओढा राहिला आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.४८ टक्क्यांनी कमी लागला आहे.
वाणिज्यच्या निकालात बदल नाही
तुलनेने वाणिज्य शाखेचा निकाल १.२२ टक्क्यांनी कमी लागला असून, वाणिज्यच्या गुणवत्तेत घसरण कमी असल्याचे प्राचार्य पी.एन. सगर यांनी सांगितले.