दुध तापविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने लातुरात विद्यार्थिनी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:25 PM2020-02-07T12:25:32+5:302020-02-07T12:29:27+5:30
घडलेल्या घटनेत काही गुन्हा असेल तर पोलीस सक्षमपणे कारवाई करतील.
लातूर : सायंकाळच्या वेळी दूध तापविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी जखमी झाली असून तिच्या चेहऱ्याला तसेच उजव्या हाताला भाजले आहे. दरम्यान, सदरील जखमी मुलगी व तिच्या आईच्या जबाबानुसार पेटवून दिल्याची पसरविलेली माहिती चुकीची असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.
दीपज्योतीनगरमधील दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सायंकाळच्या वेळी घरात दूध तापवित होती. त्यावेळी अचानक स्टोव्हचा भडका होऊन ती भाजली. घटना घडली तेव्हा घरी कोणीही नव्हते. पहिल्यांदा लहान भावाने बहीण भाजल्याचे बघितले. आरडाओराडा करुन शेजाऱ्यांना बोलविले. त्यांनी मुलीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने म्हणाले, आईचा आणि मुलीचा जबाब डॉक्टरांसमोर घेतला आहे. त्यानुसार दूध तापविताना ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जबाब घेतलेला नव्हता. पोलीस सर्व बाजूंनी तपास करतील. परंतु, सद्यस्थितीत तरुणीला पेटविले अशी माहिती पसरविणे चुकीचे आहे. घडलेल्या घटनेत काही गुन्हा असेल तर पोलीस सक्षमपणे कारवाई करतील. परंतु, राज्यात घडत असलेल्या घटनांचा संदर्भ देऊन चुकीची माहिती कोणीही पसरवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. माने यांनी केले. दरम्यान, यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी जबाब घेतले आहेत. त्यामध्ये कोणावरही आरोप नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही.
गॅस चार दिवसांपूर्वी संपला़
घरातील गॅस सिलेंडर चार दिवसांपूर्वी संपल्यामुळे मुलगी स्टोव्हवर दूध तापवित होती़ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता गॅसचे रेग्यूलेटर काढून ठेवलेले होते़ यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे म्हणाले, भडका उडाल्यानंतर मुलगी तोंडावर पाणी मारत होती़ तितक्यात भाऊ आला़ दोघेही ओरडले़ शेजारी चुलती राहते़ तीही धावत आली़ त्यानंतर सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले़