स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत अध्यापनाचे धडे
By आशपाक पठाण | Published: May 12, 2024 07:45 PM2024-05-12T19:45:48+5:302024-05-12T19:46:00+5:30
रेणा साखर कारखान्याचा पुढाकार : दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र
लातूर: शासकीय सेवेत संधी मिळावी म्हणून अनेक विद्यार्थी विविध केंद्रात शुल्क भरून तयारी करतात. लातूर शहरातही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र रेणा साखर कारखान्याच्या पुढाकारातून लातुरातही सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी याकरिता माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून रेणापुर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखाना व लातूर येथील सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय नि:शुल्क सुरू करण्यात आले आहे.
एम.पी.एस.सी.कम्बाईन व सरळसेवा ऑनलाईन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांचा क्रॅश कोर्स १३ मे पासून सुरू होत आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे यांनी केले आहे.
आता दुसरी शाखा लातुरात..
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्पर्धा परीक्षा केंद्राची दुसरी शाखा लातूर येथे श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात सुरू करण्यात आली आहे. तसेच निवाडा येथेही कारखाना स्थळी मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. एम.पी.एस.सी. राज्यसेवा पीएसआय एसटीआय/ एएसओ बँकिंग, सरळसेवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस आहेत. प्रत्येक बॅचचे नियमित ऑनलाईन व ऑफलाइन लेक्चर्स, निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद, डिजिटल अभ्यासिका व सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्राचे समन्वयक प्रा. विनोद नवगिरे यांनी सांगितले.