विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; शिष्यवृत्तीतील शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांत त्वरित करा जमा
By हणमंत गायकवाड | Published: January 8, 2024 01:14 PM2024-01-08T13:14:44+5:302024-01-08T13:15:18+5:30
समाजकल्याणचे आवाहन; शैक्षणिक शुल्काची रक्कम सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक
लातूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील केंद्र शासनाच्या हिश्श्यातील ६० टक्के रक्कम महाडीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. यातील शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांच्या खात्यात सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर राहणार आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू आहे. या योजनेंतर्गत १७ मार्च २०२२ व ७ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या हिश्श्याची ६० टक्के रक्कम महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयांना सात दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. सन २०२१-२२ व २०२२-२३ वर्षांतील केंद्र शासनाची ६० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमाही झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली त्यांनी शैक्षणिक शुल्काची रक्कम महाविद्यालयांत जमा करावी, असे निर्देश समाजकल्याणने दिले आहेत.
६० केंद्र, तर ४० टक्के राज्य शासनाकडून
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू आहे. यातील ६० टक्के रक्कम केंद्र शासनाकडून, तर ४० टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळते. केंद्राची ६० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न खात्यावर जमा होते, तर राज्याकडून मिळणारी ४० टक्के रक्कम महाविद्यालयांच्या खात्यावर जमा होते. एकत्र महाविद्यालय किंवा विद्यार्थ्यांच्या खात्यावर ती जमा होत नसल्याने हा घोळ झाला आहे.
सात दिवसांच्या आत जमा करणे नियम
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी महाविद्यालयास अनुज्ञेय असलेल्या फीची रक्कम तत्काळ महाविद्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. विद्यार्थ्यांनी ६० टक्के रक्कम जमा झाली असेल तर महाविद्यालयास अनुज्ञेय असलेली फी त्यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.