विद्यार्थी, पोस्टमन एकाच ठिकाणी; इमारतीअभावी २० वर्षांपासून शाळेच्या खोलीतच भरते पोस्ट

By संदीप शिंदे | Published: August 8, 2023 03:52 PM2023-08-08T15:52:48+5:302023-08-08T15:54:48+5:30

ना शाळेला जागा पुरेना ना पोस्टाला; विद्यार्थी, नागरिकांची होतेय गैरसोय

Students, postmen in one place; For lack of building, the post has been filled in the school room for 20 years | विद्यार्थी, पोस्टमन एकाच ठिकाणी; इमारतीअभावी २० वर्षांपासून शाळेच्या खोलीतच भरते पोस्ट

विद्यार्थी, पोस्टमन एकाच ठिकाणी; इमारतीअभावी २० वर्षांपासून शाळेच्या खोलीतच भरते पोस्ट

googlenewsNext

जळकोट : येथील टपाल कार्यालय तालुक्यातील मुख्य असल्याने ग्रामीण भागातून ग्राहक, कर्मचाऱ्यांची ये-जा असते. मात्र, मागील २० वर्षांपासून शाळेच्या वर्गखोलीत कार्यालयाचे कामकाज सुरू असून, पुरेशी जागा नसल्याने कामात व्यत्यय येत आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत उभारावी, अशी मागणी ग्राहकांतून करण्यात येत आहे. याबाबत डाक अधीक्षकांकडे निवेदनही पाठविण्यात आले आहे.

१९९९ मध्ये लातूर जिल्ह्यात जळकोट हा नवीन तालुका निर्माण झाला तरी येथे पोस्ट कार्यालय कार्यान्वित करण्यात आले नव्हते. तालुक्यातील जनतेची केवळ ब्रॅंच पोस्ट ऑफिसवरच बोळवण होती. त्यामुळे गरजू नागरिकांना आपल्या कामांसाठी उदगीर, अहमदपूर, मुखेड आदी ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. स्थानिक पातळीवरून केंद्र सरकारकडे सततचा आणि जोरदार पाठपुरावा केल्यानंतर तालुक्यासाठी नवीन सब टपाल कार्यालय मंजूर करण्यात आले.

ऐनवेळी कोणतीच इमारत उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषद प्रशालेची एक खोली टपाल कार्यालयास देण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायतीमार्फत या खोलीची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर डाक विभाग या कार्यालयासाठी स्वतंत्र व पुरेशी इमारत उपलब्ध करून देईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, २० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी डाक विभागाच्या दुर्लक्षामुळे एका छोट्याशा खोलीतूनच विभागाचा तालुक्याचा कारभार सुरू आहे. एकच आणि तीही लहान खोली असल्याने अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत. जागेअभावी आवश्यक भौतिक सुविधांचा अभाव, एकमेव सब पोस्टमास्तर वगळता बाकी कर्मचाऱ्यांची उणीव यामुळे कार्यरत सब पोस्टमास्तर यांच्यावरचा ताणही वाढत असून ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे टपाल विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अधिक ग्राहक आल्यास जागा अपुरी...
एकावेळी अधिक ग्राहक आले तर त्यांना जागा पुरत नाही. त्यामुळे काही वेळ प्रतीक्षा करीत बाहेर थांबावे लागते आणि मग पोस्टात जावे लागते. शाळेतच सब पोस्ट ऑफिस असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होतो तसा ग्राहकांनाही होतो. शाळेलाही एक खोली कमी पडत आहे. त्यामुळे स्वतंत्र व परिपूर्ण इमारतीची गरज आहे. तालुक्यातील ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी येथील सब पोस्ट ऑफीसला पुरेशी इमारत उपलब्ध करून द्यावी, तसेच भौतिक सुविधांसह पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डाकघर अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे करण्यात आली आहे.

Web Title: Students, postmen in one place; For lack of building, the post has been filled in the school room for 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.