राहत्या घरात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Published: March 14, 2017 02:57 PM2017-03-14T14:57:04+5:302017-03-14T14:57:04+5:30
लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 14 - लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय माळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवारी त्याने शंकरनगर भागातील नवीन बांधकाम झालेल्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. परीक्षेच्या तणावातून त्यानं आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून विजय अस्वस्थ
विजय हा गेल्या दोन-तीन दिवसांपासून तणावाखाली असल्यामुळे तो अस्वस्थ होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. घरीही फारसे कोणाशी बोलत नव्हता. शिवाय त्याचा इयत्ता बारावीचा मंगळवारी शेवटचा पेपर होता. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. यातून त्याच्यावर बारावीचे पेपर अवघड गेले असावेत, असेही कुटुंबीयांनी सांगितले.
पंधरा दिवसात दुसरी घटना
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी राहत्या खोलीवर इयत्ता ११ वीत असलेली अनुसरी झींजे या मुलीनेही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसातील विद्यार्थी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.