लातूरच्या विद्यार्थ्यांची भरारी; हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये प्रशिक्षणासाठी ६० जणांची निवड
By संदीप शिंदे | Published: February 14, 2023 06:14 PM2023-02-14T18:14:39+5:302023-02-14T18:15:46+5:30
केंद्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२२ पासून अभ्यासक्रमनिहाय ऑन जॉब ट्रेनिंगचा समावेश सर्व व्यावसायिक ट्रेडमध्ये केला आहे.
लातूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील टर्नर, फिटर, मशिनिस्ट या अभ्यासक्रमातील ६० विद्यार्थ्यांची नाशिक येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स या लढाऊ विमान तयार करणाऱ्या कंपनीमध्ये प्रशिक्षणसाठी निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात २० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यात इतर विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२२ पासून अभ्यासक्रमनिहाय ऑन जॉब ट्रेनिंगचा समावेश सर्व व्यावसायिक ट्रेडमध्ये केला आहे. संस्थेमध्ये शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना अद्यावत व दर्जेदार कौशल्यदायी प्रशिक्षण मिळावे, यासाठी संस्थेमध्ये विविध उपक्रम मागील काही वर्षांपासून राबवले जात आहेत. १९६३ मध्ये लातूर आयटीआयची स्थापना झाली असून, मागील ५० वर्षात प्रथमच लढाऊ विमान तयार करणाऱ्या नाशिक येथील हिंदुस्थान एरोनाॅटिक्स या केंद्र शासनाच्या कंपनीत विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. हे प्रशिक्षण १५० तासांचे राहणार असून, प्रथमच लातूर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे व्यवस्थापक सिंघल, सहायक व्यवस्थापक मांगुरकर, उपव्यवस्थापक वैद्य, संजय सावळकर, औरंगाबाद विभागाचे सहसंचालक सतीश सुर्यवंशी, आयटीआयच्या प्राचार्य मनिषा बोरुळकर यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान, लातूरच्या विद्यार्थ्यांना प्रथमच लढाऊ विमान बनविणाऱ्या केंद्र शासनाच्या कंपनीत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली असल्याने कौतूक होत आहे.