लातूर मनपाच्या वाचन कट्ट्याचे यश; १ लाख वाचक, १३ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड
By हणमंत गायकवाड | Published: November 18, 2023 05:03 PM2023-11-18T17:03:41+5:302023-11-18T17:04:29+5:30
वाचन कट्ट्यासह ग्रंथालयात येऊन या वाचकांनी ज्ञान मिळविण्याची भूक भागविली आहे.
लातूर : महानगरपालिकेच्या ग्रंथालयाच्या वतीने मनपाच्या चारही झोनमध्ये प्रत्येकी दोन वाचन कट्ट्यांची निर्मिती करण्यात आली असून, गेल्या वर्षभरात १ लाख वाचकांनी या योजनेअंतर्गत वृत्तपत्र वाचनाचा लाभ घेतला आहे.
वाचन कट्ट्यासह ग्रंथालयात येऊन या वाचकांनी ज्ञान मिळविण्याची भूक भागविली आहे. मराठी, हिंदू, उर्दू माध्यमातील जवळपास ४५ वृत्तपत्र वाचकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या ग्रंथालयाने गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले आहेत. वाचन कट्ट्याच्या निर्मितीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिले असून, या अभ्यासिकेतील १३ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झालेली आहे.
९५० ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे जवळपास ९५० ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रात्रं-दिवस विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय खुले आहे. त्यामुळेच १३ विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड झालेली आहे.
अंध वाचकांसाठी ब्रेल लिपीमध्ये ग्रंथ
शहरातील अंध वाचकांची सोय व्हावी, यासाठी लातूर मनपाच्या ग्रंथालयाने ४० दर्जेदार ग्रंथ ब्रेल लिपीमधून उपलब्ध केले आहेत. त्याचा लाभ वाचक घेतात. केवळ वृत्तपत्रच नाही, तर संदर्भ ग्रंथ आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे ग्रंथ ग्रंथालयाने उपलब्ध केले आहेत.
१६ कॅमेऱ्यांची नजर
ग्रंथालय इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, १६ कॅमेऱ्यांची नजर ग्रंथालयावर आहे. आतून आणि बाहेरून १६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना तसेच वाचकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रंथालयातून सेवा दिली जात आहे.
५० हजार ग्रंथसंपदा
महानगरपालिकेच्या शिवछत्रपती वाचनालयामध्ये ५० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. शिवाय, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ९५० ग्रंथ उपलब्ध असून, चालू घडामोडींसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषेत ४५ वर्तमानपत्रेही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
२४ तास ग्रंथालय खुले
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय २४ तास खुले आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरात १३ विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पदांवर निवड झाली आहे. मोफत सेवा देणारे एकमेव ग्रंथालय असून, यात अधिक ग्रंथसंपदेची भर पाडली जाणार असल्याची माहिती आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.