लातूर जिल्ह्यात ड्राय रन यशस्वी; लसीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:05 PM2021-01-08T16:05:03+5:302021-01-08T16:06:36+5:30
corona vaccine पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
लातूर : कोविड-१९ प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५ ठिकाणी ड्राय रन मोहीम राबविण्यात आली. शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय मुरुड, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, प्राथमिक आरोग्य केंद्र भातांगळी आणि मनपाच्या मंठाळे नगरातील दवाखान्यात ड्राय रन करण्यात आला.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी या रंगीत तालमीची पाहणी करून संबंधितांना सूचना केल्या. पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी १७ हजार ५०० डॉक्टर्स, कर्मचारी, नर्सेस यांची नोंद करण्यात आली आहे. रंगीत तालीममध्ये या पाच केंद्रावर प्रत्येकी २५ जणांना बोलावून लसीकरणाच्या अनुषंगाने रंगीत तालीम घेतली. ऑनलाईन नोंदणीसाठी कोविन सॉफ्टवेअर वापरण्यात आले. प्रत्यक्ष लसीकरणाला काही अडचणी येऊ नये म्हणून ही तालीम घेण्यात आली. लसीकरणाच्या वेळी जी सुविधा राहणार आहे, तशीच सुविधा ड्राय रनमध्ये होती. निरीक्षण कक्ष, लसीकरण कक्ष, प्रतीक्षा कक्ष असे कक्ष स्थापन करण्यात आले होते. सदर पाच केंद्रांवर प्रत्येकी २५ लोकांना बोलावून ड्राय रन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्राय रनची पाहणी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात ड्राय रनण मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, प्रस्तुत केंद्रावर प्रत्येकी २५ लोकांना बोलाविण्यात आले होते. व्हॅक्सीन देताना जी प्रक्रिया होणार आहे, ती सर्व प्रक्रिया यावेळी करण्यात आली. जेणेकरून व्हॅक्सीन देताना अडचण निर्माण होणार नाही. ड्राय रन मोहीम जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी झाल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.