विहिर आटली, भाजीपाला सुकला; कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By राजकुमार जोंधळे | Published: April 7, 2024 12:01 AM2024-04-07T00:01:18+5:302024-04-07T00:01:27+5:30
लातूर जिल्हा : विहिरीत उडी घेत संपविले जीवन
औराद शहाजानी (जि. लातूर) : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील विहिर आटली अन् भाजीपाला सुकला. यातून रब्बी पिकासह भाजीपाज्याचे मोठे नुकसान झाले. यातून आता कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बाेटकुळ (ता. निलंगा) येथे घडली.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील बोटकुळ येथील ज्ञानेश्वर राम मोरे (वय २३) यांचा उदनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत भाजीपालासह इतर पिकांचे उत्पादन घेतात. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी चार एकरावर लातूर जिल्हा बँकेचे कर्ज शेतीसाठी घेतले होते. शेतात त्यांनी पारंपरिक शेतीबराेबरच विविध प्रयोग करून भाजीपाला उत्पादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे त्यांचे माेठे नुकसान झाले. लागवड खर्चही पदरी न पडल्याने मोठे नुकसान झाले. यंदा परतीचा पाऊस न पडल्याने शेतातील विहीर उन्हाळ्यापूर्वीच आटली. त्याचबराेबर डाेक्यावर शासकीय कर्जासह खाजगी व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाचे ओझे वाढले. आता अशा स्थितीत कर्जाची परतफेड कशी करायची? या विवंचनेत असलेले ज्ञानेश्वर माेरे हे गुरुवारी पहाटे घरातून निघून गेले.
शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत आढळला. निलंगा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पाे.हे.काॅ. धनराज हारणे करीत आहेत.