सर्व्हिस रस्त्यासाठी लातूर जिल्ह्यातील सुनेगाव सांगवी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
By हरी मोकाशे | Published: May 7, 2024 12:08 PM2024-05-07T12:08:43+5:302024-05-07T12:09:38+5:30
अहमदपूर- नांदेड महामार्गावरील या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी, गावकऱ्यांना पाच ते सहा किमीचा फेरा घालावा लागत आहे.
लातूर : अहमदपूर- नांदेड महामार्गावरील सुनेगाव सांगवी गावात जाण्यासाठी जोड रस्ता तयार करावा तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी सर्व्हिस रस्ता निर्माण करण्यात यावा, या मागणीसाठी गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. दरम्यान, तालुका निवडणूक प्रशासन गावात दाखल झाले आहे.
अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी हे जवळपास दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात एकूण मतदार संख्या ४७७ आहे. त्यात २५६ पुरुष आणि २२१ महिला मतदार आहेत. अहमदपूर- नांदेड महामार्गावरील या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी, गावकऱ्यांना पाच ते सहा किमीचा फेरा घालावा लागत आहे. त्यामुळे रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भात गत महिन्यात प्रशासनास निवेदनही देण्यात आले. मात्र, अद्यापही दखल घेतली नसल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. ग्रामस्थ गावच्या पारावर एकत्र येऊन बसले आहेत. दरम्यान, गावातील मतदारांशी चर्चा करुन समजूत काढण्यासाठी अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड हे गावात दाखल झाले आहेत.
सकाळी ११ वा. पर्यंत २०.७४ टक्के मतदान...
लातूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान झाले आहे. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी वगळता अन्य सर्व ठिकाणी मतदान सुरळीत सुरु आहे. सकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.