कर्णबधीर बालकांच्या हाकेला लातूर जिल्हा परिषदेची मदतीची साथ; बेरा मशीनवर होणार तपासणी
By हरी मोकाशे | Published: July 15, 2023 06:14 PM2023-07-15T18:14:58+5:302023-07-15T18:15:14+5:30
पालकांची धावपळ थांबली; स्त्री रुग्णालयाला दिली अत्याधुनिक बेरा मशिन
लातूर : शहरातील स्त्री रुग्णालयात बालकांच्या कर्णदोषाच्या तपासणीसाठीची मशिन नसल्याने पालकांची धावपळ होत होती. शिवाय, रुग्णालय प्रशासनाला खासगी केंद्राला पैसे देऊन मनधरणी करावी लागत होती. ही अडचण जाणून घेत जिल्हा परिषदेने आपल्या सेस फंडातून स्त्री रुग्णालयाला अत्याधुनिक बेरा मशिन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वेळेत आणि विनामूल्य उपचार मिळू लागल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील स्त्री रुग्णालय हे शंभर खाटांचे असून, तिथे महिन्याकाठी सरासरी ३०० महिलांच्या प्रसूती होतात. दरम्यान, जन्मजात कर्णदोष असलेल्या बालकांवर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून प्रत्येक नवजात शिशूची ‘ओएई’ ही कानाची तपासणी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. या तपासणीत ऐकण्यास सक्षम नसलेल्या बालकांच्या कानाची बेरा ही तपासणी केली जाते.
स्त्री रुग्णालयात या तपासणीसाठीची मशिन नसल्याने खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असे. त्यासाठी वार्षिक करार करून तपासणीनुसार पैसे द्यावे लागत असत. परिणामी, तपासणीसाठी वेळेबरोबरच पैशांचाही खर्च होत असे. ही अडचण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जाणून घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के रकमेतून बेरा ही अत्याधुनिक मशिन स्त्री रुग्णालयाला उपलब्ध करून दिली आहे.
रुग्णालयाची वार्षिक सव्वा लाखांची बचत...
जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या मशिनची किंमत जवळपास ११ लाख ५० हजार रुपये आहे. या मशिनमुळे स्त्री रुग्णालयाची वार्षिक सरासरी १ लाख २४ हजार रुपयांची बचत झाली आहे. शिवाय, रुग्णालयातच तपासणी करण्यात येत असल्याने पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
तर लेकरू होऊ शकते मूकबधीर...
बाळाच्या कानावर आपले बोललेले शब्द पडल्यानंतर ते ऐकून बाळ त्याची उच्चारणा करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे बाळांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषत: मुदतपूर्व प्रसूती तसेच कमी वजन असलेल्या शिशूंची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कर्णदोषामुळे बालक मूकबधीर होण्याची भीती असते, असे कान, नाक, घसा तज्ज्ञांनी सांगितले.
तपासणीसाठीची परवड थांबली...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांनी कर्णदोष असलेल्यांवर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के रकमेतून ही मशिन उपलब्ध करून दिली. त्यामुळे ऐकू न येणाऱ्या बालकांना तपासणीसाठी पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांत घेऊन जावे लागणार नाही. येथेच निदानासाठी तपासणी होणार आहे.
- संतोषकुमार नाईकवाडी, समाज कल्याण अधिकारी
स्त्री रुग्णालयातच आता सुविधा...
जिल्हा परिषदेने मशिन उपलब्ध करून दिल्याने आता स्त्री रुग्णालयातच कर्णदोष असलेल्या बालकांच्या ओएई आणि बेरा या दोन्ही तपासण्या होत आहेत. त्यामुळे पालकांची धावपळ थांबण्याबरोबरच पैशांचीही बचत झाली आहे.
- डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय.