पठाणकोटमध्ये चकमक, लातूर जिल्ह्यातील थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:23 PM2022-06-27T21:23:06+5:302022-06-27T21:23:17+5:30
साेमवारी पहाटे पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत सूर्यकांत तेलंगे शहीद झाले.
थेरगाव (जि. लातूर) : पठाणकोट येथील सीमेवर कर्तव्य बजावताना झालेल्या चकमकीत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे (३५) हे सोमवारी पहाटे शहीद झाले. ही माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शेतकरी कुटुंबातील जवान सूर्यकांत तेलंगे यांना लहानपणापासून सैन्य दलात जाण्याची इच्छा होती. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले आणि रापका येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी सुरू केली. महाड येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले आणि सन २००७ मध्ये ते सैन्य दलात भरती झाले.
साेमवारी पहाटे पठाणकोट येथील सीमेवर चकमक झाल्याने त्यात जवान सूर्यकांत तेलंगे हे शहीद झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांचा विवाह सन २०१४ मध्ये झाला होता. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.