सुशीलाताई पाटील निलंगेकर यांचे निधन; रुग्णालयात उपचार सुरू होते
By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2025 04:56 IST2025-02-17T04:54:46+5:302025-02-17T04:56:00+5:30
मृत्यूसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर साेमवार, १७ फेब्रुवारीराेजी सिंदखेड येथील शेतात दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुशीलाताई पाटील निलंगेकर यांचे निधन; रुग्णालयात उपचार सुरू होते
निलंगा (जि. लातूर) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने रविवारी रात्री ८.३० वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर साेमवार, १७ फेब्रुवारीराेजी सिंदखेड येथील शेतात दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या त्या माताेश्री हाेत. तर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे, जावई असा माेठा परिवार आहे.
निलंगा तालुक्यातील बामणी धानाेरा शेतकरी अप्पाराव धानुरे यांची कन्या सुशिलाताई यांचा विवाह १९५१ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाेबत झाला. त्यांनी चार मुले, एक मुलगी असा परिवार सांभाळत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आयुष्यभर खंबीर साथ दिली. त्या अंत्यत प्रेमळ, कुटुंब वत्सल्य, सुसंस्कारित, आदरातिथ्यशील गृहिणी हाेत्या. डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रगतीशील जिवनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
शेती व घरकामाच्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे सांभाळल्या त्यामुळेच निलंगेकरांना सार्वजिनक व राजकीय जिवनात यशस्वीरित्या काम करता आले. अलिकडे त्या काही दिवसांपासून आजारी हाेत्या. उपचारासाठी त्यांना लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान, उपचार सुरु असताना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या सर्वांसाठी आईसाहेब म्हणून परिचित हाेत्या.