लातुरात एकाचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 08:38 PM2019-06-02T20:38:53+5:302019-06-02T20:39:05+5:30
शहरातील क्वाईल नगर येथे राहणाऱ्या भावडासिंग जुन्नी (४०) यांचा मृतदेह टिळक नगर परिसरातील एका विहिरीत रविवारी सकाळी आढळून आला.
लातूर : शहरातील क्वाईल नगर येथे राहणाऱ्या भावडासिंग जुन्नी (४०) यांचा मृतदेह टिळक नगर परिसरातील एका विहिरीत रविवारी सकाळी आढळून आला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांनी भेट देवून पाहणी केली. दरम्यान, भावडासिंग जुन्नी यांचा मृत्यू संशायस्पद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले, भावडासिंग जुन्नी हे गेल्या दोन दिवसांपासून गायब होते. कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र, ते आढळून आले नाहीत. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी दिलेल्या तक्रारीवरुन हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शहरातील टिळक नगर परिसरातील एका विहिरीत भावडासिंग जुन्नी यांचा मृतदेह आढळून आला. याची माहिती त्यांच्या कुटुंबियासह शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून सदरचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत्यूचे कारण समजेना...
भावडासिंग जुन्नी यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? याचा तपास पोलीस करीत आहेत. सध्यातरी त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. कुटुंबिय आणि त्यांच्या नजीकच्या व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सायंकाळपर्यंत या संशयास्पद मृत्यूबाबत ठोस असे कारण पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दरम्यान, या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाकडून घटनेचा कसून तपास केला जात आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी दिली.
भावाला घातपाताचा संशय...
भावडासिंग जुन्नी हे गेल्या दोन दिवसांपासून गायब होते. याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी पाहुण्यांसह सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ते आढळून आले नाहीत. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिल्यानंतर मयताच्या भावाने पोलिसांकडे घातपाताची शंका व्यक्त केली होती. माझ्या भावाचा मृत्यू हा घातपातानेच झाला असल्याचा संशय भावडासिंगच्या भावाने व्यक्त केला आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी...
मयत भावडासिंग जुन्नी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून, विविध पोलीस ठाण्यामध्ये कलम ३०७, दंगल, खंडणी आणि जबर दुखापत करणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगानेही पोलीस तपास करत असल्याचे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी सांगितले.