पाेलिसांचा संशय बळावला; दुचाकींसह चाेरटा अडकला !
By राजकुमार जोंधळे | Published: October 21, 2023 01:40 PM2023-10-21T13:40:56+5:302023-10-21T13:41:24+5:30
चार दुचाकी जप्त : मुरुड पाेलिसांची कारवाई
मुरुड (जि. लातूर) : तालुक्यातील तांदुळजा येथे रांजणी राेडवरून येणाऱ्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील व्यक्तीवर पाेलिसांचा संशय बळावला आणि पाेलिसांनी ती दुचाकी थांबवून झाडाझडती घेतली असता, दुचाकीचाेरीचे बिंगच शनिवारी सकाळी फुटले. अधिक चाैकशीअंती चाेरीतील चार दुचाकी पाेलिसांच्या हाती लागल्या. पाेलिसांनी त्याला अटक केली असून, याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, मुरुड पाेलिस ठाण्यासह लातूर शहराच्या हद्दीतून दुचाकी पळविण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. दरम्यान, तांदुळजा येथे पोलिस कर्मचारी खोपे, बोईनवाड, पोलिस नाईक राठोड गस्तीवर हाेते. रांजणी राेडवरून संशयित व्यक्ती दुचाकीवरून चाैकाकडे येताना आढळून आला. तांदुळजा चाैकात वाहनांची तपासणी करताना तानाजी राम शिंदे (३०, रा. एरंडी सारोळा ता. औसा, जि. लातूर) याला थांबवत त्याच्याकडील दुचाकीची चाैकशी केली. ताब्यातील दुचाकीच्या (एमएच २४ झेड ३१५७) कागदपत्रांची चाैकशी केली असता, यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यातून पाेलिसांचा संशय अधिक बळावला. त्याला ताब्यात घेत मुरुड पाेलिस ठाण्यात आणण्यात आले. पाेलिसी खाक्या दाखवताच तानाजी राम शिंदे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी ही चाेरीतील असल्याचे समाेर आले. पाेलिसांनी कसून चाैकशी केली असता, त्याने इतर तीन दुचाकी चाेरल्याचे सांगत त्या पाेलिसांच्या ताब्यात दिल्या. जप्त केलेल्या चारपैकी तीन दुचाकी या लातुरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे समाेर आले. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर ग्रामीणचे उपविभागीय पाेलिस अधिकारी सुनील गोसावी, मुरुड पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड येथील पोलिस कर्मचारी खोपे, बोईनवाड, पोलिस नाईक राठोड यांच्या पथकाने केली आहे.