लातूर शहरात कचरा स्पॉटवर स्वच्छता ताईंची नजर; दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र
By हणमंत गायकवाड | Published: August 8, 2023 02:48 PM2023-08-08T14:48:49+5:302023-08-08T14:49:19+5:30
शहरात २० जणांवर दंडात्मक कारवाई, तर सहाजणांवर पोलिसांकडून नोटीस
लातूर : कचरा उचलल्यानंतरही वारंवार कचरा पडणाऱ्या ठिकाणी आता स्वच्छता ताईंची नजर राहणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छता ताई कचरा पडणाऱ्या ठिकाणी थांबून कचरा टाकणाऱ्यांना प्रारंभी समजून सांगत आहेत. त्यानंतरही न ऐकल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत २० जणांवर दंडात्मक, तर सहा जणांवर पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
लातूर शहरामध्ये ६० ते ७० कचरा स्पॉट आहेत. तिथे झालेल्या कचरा साफ केल्यानंतर दोन दिवसांतच कचऱ्याचा ढीग पडत आहे. प्रत्येक नगरात नियमित घंटागाडी येत असताना नागरिक त्या ठिकाणी कचरा फेकून टाकतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक रिंग रोड परिसर, तसेच शहरातील प्रकाशनगर, छत्रपती चौक, सिद्धेश्वर समशानभूमी ६० फुटी रोड, बार्शी रोडचा समांतर रस्ता, खाडगाव रोड, अंबाजोगाई रोड आदी ठिकाणी कचरा टाकण्याचे स्पॉट झाले आहेत. या ठिकाणी कचरा उचलल्यानंतर दोन दिवसांत पुन्हा कचरा पडतो. त्यामुळे अशा ठिकाणी आता स्वच्छता ताईंची नजर राहणार आहे. कचरा टाकल्यानंतर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये अंबाजोगाई रोड परिसरात कचरा स्पॉट साफ केल्यानंतर कचरा टाकल्याने २० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर सहाजणांना पोलिसांमार्फत नोटीस पाठविण्यात आली आहे.
अशा लोकांकडून झाले कचरा स्पॉट...
शहरालगत वस्त्या असलेल्या नागरिकांकडून कामावर जाताना फेकला जातो कचरा. शहरातच राहणारे; परंतु दोघेही नोकरीवर असलेल्या नागरिकांकडून रस्त्यावरच टाकला जातो कचरा. परिसरातील दुकानदार सायंकाळच्या वेळी दुकान बंद करताना साफसफाई करून रस्त्यावर कचरा टाकतात.
दररोज दीडशे टन कचरा संकलन होऊनही कचरा स्पॉट...
लातूर शहरात दररोज घंटागाडीमार्फत दीडशे टन कचऱ्याचे संकलन केले जाते. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. स्वच्छतेचे गाणे ऐकवीत घंटागाडी घरोघरी जाते. तरीही कचऱ्याचे स्पॉट मनपाची डोकेदुखी बनत आहे.
दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोहीम तीव्र होणार
घंटागाडी येत नसेल तर ठीक आहे; पण प्रत्येक नगरात, वॉर्डात दररोज घंटागाडी कचरा संकलनासाठी जाते. तरीही बाहेर रस्त्यावर कचरा फेकला जातोय. यावर आता दंडात्मक आणि पोलिस कारवाई तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी कचरा स्पॉटवर आता स्वच्छता ताईंची नियुक्ती करण्यात आली आहे.