गुळाचा गोडवा वाढला; दररोज ६०० क्विंटलची आवक, भावही वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

By हरी मोकाशे | Published: January 13, 2024 05:30 PM2024-01-13T17:30:43+5:302024-01-13T17:31:41+5:30

राज्यातील गुळाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर आहे. येथील गुळाला विदर्भ, खान्देश, गुजरातमध्ये मोठी मागणी असते.

Sweetness of jaggery has increased, inflow of 600 quintals per day, farmers are relieved as the price has also increased | गुळाचा गोडवा वाढला; दररोज ६०० क्विंटलची आवक, भावही वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

गुळाचा गोडवा वाढला; दररोज ६०० क्विंटलची आवक, भावही वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

लातूर : मकरसंक्रांतीनिमित्ताने बाजारपेठेत गुळास मागणी वाढली आहे. शहरातील बाजार समितीत दररोज सरासरी ६०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सध्या सर्वसाधारण ३ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ७०० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याने गोडवा वाढल्याचे पहावयास मिळत आहे.

गुळाचा हंगाम हा साधारणत: नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. राज्यातील गुळाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर आहे. येथील गुळाला विदर्भ, खान्देश, गुजरातमध्ये मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी येथील बाजार समितीत दररोज जवळपास २५ ते ३० हजार गुळाच्या डागांची आवक होत होती. मात्र, काही वर्षांपासून गुळवे, कामगारांची कमतरता त्याचबरोबर साखर कारखाने, गूळ पावडर कारखाने निर्माण झाल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर संक्रांत आली आहे. मात्र, काही शेतकरी आजही गुळाचे उत्पादन घेतात. ग्राहकांची मागणी जाणून घेऊन त्या पद्धतीने शेतकरी गूळ उत्पादन करीत आहेत.

सर्वसाधारण दर ३७०० रुपये...
येथील बाजार समितीच्या माणिकराव सोनवणे गुळ मार्केटमध्ये दररोज जवळपास ६०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. कमाल दर ४ हजार ५० रुपये तर किमान भाव ३ हजार २७५ रुपये मिळत आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण भाव ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे.

यंदा किमान दरातही वाढ...
वर्ष - कमाल- किमान - साधारण भाव

जाने. २०२२ - ३००० - २४८१ - २७३०
जाने. २०२३ - ३८०० - २५८० - ३०१०
जाने. २०२४ - ४०५० - ३२७५ - ३७००

उत्पादन घटले, मागणी वाढली...
काही वर्षांत साखर कारखाने, गूळ पावडर कारखाने सुरू झाल्याने जिल्ह्यात गुळाचे उत्पादन घटले आहे. लातूर, कोल्हापूर, सांगली, कराड येथील गुळाला सर्वाधिक मागणी असते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वसाधारणपणे दरात जवळपास ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा गूळ उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे.
- ललितभाई शहा, माजी सभापती, बाजार समिती.

गुऱ्हाळ चालविणे कठीण...
गुऱ्हाळासाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र, सध्या मजूर मिळत नाहीत. त्यातच मजुरी वाढली आहे. शिवाय, खत आणि औषधांच्या किमती वाढल्या आहेत. उत्पादन आणि खर्चाचे गणित जुळत नाही. त्यामुळे गुऱ्हाळ चालविणे कठीण झाले आहे.
- संतराम बंडे, शेतकरी, चिमाचीवाडी.

शरीरासाठी गुळ लाभदायक...
गूळ हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गुळामध्ये कार्बोहायड्रेड, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे घटक असतात. त्यामुळे नैसर्गिक उर्जास्त्रोत ठरते. गुळामुळे पचनक्रिया चांगली होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. रक्तवाढ होते. पित्तनाशक आहे. मात्र, गूळ योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे. अंग मेहनत तसेच प्रवास करणाऱ्यांनी सोबत गूळ ठेवावा. दिवसभरातून २५ ग्रॅमपर्यंत गूळ सेवन करावे.
- डॉ. दत्ता अंबेकर, आहार तज्ज्ञ.

 

Web Title: Sweetness of jaggery has increased, inflow of 600 quintals per day, farmers are relieved as the price has also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.