टी १० स्पर्धेमुळे ग्रामीण टॅलेंटला मिळाले प्रोत्साहन: अभिनेते रितेश देशमुख
By राजकुमार जोंधळे | Published: May 26, 2024 08:55 AM2024-05-26T08:55:36+5:302024-05-26T08:56:21+5:30
लातूरकर क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी
महेश पाळणे / लातूर : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. ती गुणवत्ता पुढे येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० स्पर्धेमुळे या टॅलेंटला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा भरविणे गरजेचे असल्याचे अभिनेते रितेश देशमुख यांनी सांगितले. लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० स्पर्धेच्या ट्रॉफी अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात खेळाडूंचा सहभाग दिसून आला आहे. ३०० हून अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झाल्याने ग्रामीण खेळाडूंना वाव मिळाला आहे. तालुकास्तरावर स्पर्धा होऊन विजेते संघ जिल्हास्तरावर आले. तेथेही त्यांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले. ही ग्रामीण खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. स्पर्धा भरविण्याचे हे तिसरे वर्ष असल्याने खेळाडूंना प्रतिवर्षी वाव मिळत आहे.
कंपन्यांनीही प्रोत्साहन देणे गरजेचे...
विविध खेळाडूंना स्पर्धेच्या माध्यमातून कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. शहर व जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी स्पर्धा भरवून खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यातून अनेक गुणवान खेळाडू लातूरला मिळतील. अन् राज्य व देशपातळीवर नावलौकिक करतील. या स्पर्धेसाठी आ. धीरज देशमुख यांनीच नव्हे तर अनेकांनी यासाठी परिश्रम घेतले.
डीजे ताल आणि हलगीचा कडकडाट...
अंतिम सामन्यातील पहिल्या डावात पाच षटक संपल्यानंतर पावसाने हजेरी लावली. यावेळी काही वेळांसाठी सामना थांबविण्यात आला. तो पुन्हा सुरू झाला. त्यानंतर पुन्हा पहिल्या डावानंतर पावसाचे आगमन झाले. यावेळीही सामना काही वेळेसाठी थांबविला होता. सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा उत्साह उत्कंठावर्धक होता. प्रत्येक षटकार, चौकारावर डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली. प्रतिस्पर्धी संघाचा गडी बाद हाेताच हलगीच्या कडकडाटावरही अनेकांनी ठेका धरला. क्रीडा संकुलातील प्रेक्षागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते.
रितेश देशमुख यांनीही हलगीवर केले नृत्य...
अभिनेते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांचे आगमन होताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. आपल्या लाडक्या लयभारी हिरोला दाद देत प्रेक्षकांनी सामन्याची मजा लुटली. शेवटी मंचावर जाताना अभिनेते रितेश देशमुख यांनीही प्रेक्षकांना दाद देत हलगीच्या तालावर नृत्य केले.