फेरफरच्या अंतिम निर्णयासाठी तीन हजाराची घेताना तलाठ्याला अटक
By राजकुमार जोंधळे | Published: June 14, 2023 09:19 PM2023-06-14T21:19:08+5:302023-06-14T21:19:19+5:30
निलंगा येथे एसीबीच्या पथकाची कारवाई
राजकुमार जोंधळे / लातूर : जिल्ह्यातील राठोडा येथील शेतीच्या फेरफरप्रकरणी ऑनलाइन आक्षेप नोंदवून घेत, अंतिम निर्णय देण्याच्या कामासाठी सहा हजाराच्या लाचेची मागणी करून तीन हजाराची लाच स्विकारताना केळगावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी निलंगा येथे रंगेहात पकडले. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
एसीबीच्या सूत्रांनी सांगितले, ६७ वर्षीय तक्रारदारासह पुतण्याच्या ताब्यात राठोडा (ता.निलंगा) येथील शिवारात ८० आर कुळाची जमीन आहे. या जमिनीच्या अनुषंगाने बक्षीसपत्राच्या आधारे विरोधी पक्षाने फेरफार नोंदविण्यासाठी केळगावच्या तलाठ्याकडे अर्ज सादर केला होता. दरम्यान, यातील तक्रारदार आणि त्यांच्या पुतण्याने या अर्जावर आक्षेप नोंदविण्यासाठी तलाठ्याकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीला तलाठी कार्यालयात ऑनलाइन नोंदवून तक्रारदाराच्या बाजूने अंतिम निर्णय देण्याच्या कामात मदत करण्यासाठी केळगावचे तलाठी भिमराव निलाप्पा चव्हाण (वय ४७) याने तक्रारदाराला पंचासमक्ष प्रारंभी सहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच देण्या-घेण्याचे ठरले.
याबाबत ६७ वर्षीय तक्रारदाराने मंगळवारी लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर निलंगा येथे बुधवारी दुपारी तलाठी कार्यालयात पथकाने सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे काही वेळात तक्रारदार लाच देण्यासाठी आला. त्यावेळी तलाठी चव्हाण याने मागणी केलेली तीन हजाराच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली. यावेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकान रंगेहाथ पकडले.
याबबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लातूर येथील एसीबीचे उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या पथकाने केली. तपास पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली करत आहेत.