दैठणा येथे तलाठी सज्जा सुरु, शेतक-यांची अडचण दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:57+5:302021-05-16T04:18:57+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जुन्या तलाठी सज्जावरील महसूल कामाचा ताण कमी व्हावा तसेच शेतक-यांची महसुली कामे वेळेत व्हावीत म्हणून शासनाने ...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जुन्या तलाठी सज्जावरील महसूल कामाचा ताण कमी व्हावा तसेच शेतक-यांची महसुली कामे वेळेत व्हावीत म्हणून शासनाने दोन वर्षांपूर्वी शिरूर अनंतपाळ आणि दैठणा येथे नवीन तलाठी सज्जा कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली होती. परंतु, दैठण्यातील तलाठी कार्यालय सुरू झाले नव्हते. ग्रामस्थांकडून सतत पाठपुरावा सुुरु होता. नवीन तलाठी पदाची भरती नसल्याने महसूल प्रशासनाकडून जुन्या तलाठ्याकडेच अतिरिक्त पदभार देऊन कामकाज करण्यात येत होते. या बाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे उपविभागीय कार्यालयासह येथील तहसील कार्यालयाने स्वतंत्र सज्जा कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशा लेखी सूचना केल्या आहेत. अखेर दैठण्यातील नूतन तलाठी कार्यालय सुरु झाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, तलाठी सदानंद सोमवंशी पाटील, सरपंच लक्ष्मीबाई बिरादार, आशिष बिरादार, उपसरपंच सिताराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सदविवेक मिरकले, मेजर दिलीप बिरादार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, शेंदचे सरपंच वैशाली परबत माने, गोविंद मोरे, कल्याणराव बिरादार उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना ७/१२ चे वाटप करण्यात आले.
दोन दिवस कार्यालय...
तलाठी सज्जा कार्यालय सर्वांच्या सोयीचे असावे म्हणून येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोकराव मुळे यांनी स्वतः च्या मालकीचे दुकान सध्या मोफत उपलब्ध करून दिले आहे. मंजूर तलाठी सज्जा कार्यालयाअंतर्गत दैठणा आणि शेंद या दोन गावांचा समावेश असल्याने आठवड्यातील मंगळवार आणि गुरूवारी हे कार्यालय सुरू राहणार आहे.