चकचकीत महामार्गाची चर्चा; घरासमोर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:40 PM2019-01-24T22:40:19+5:302019-01-24T22:45:00+5:30
देशात आणि तुलनेने महाराष्ट्रात चकचकीत महामार्गांची चर्चा जोरदार आहे. सत्ता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायला एक जमेचा मुद्दा आहे.
लातूर : देशात आणि तुलनेने महाराष्ट्रात चकचकीत महामार्गांची चर्चा जोरदार आहे. सत्ता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायला एक जमेचा मुद्दा आहे. मराठवाड्यातही प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची बांधणी सुरू आहे. मावेजा अन् आंदोलनाचा धुराळा काही ठिकाणी उडत असला तरी काही कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसते. परंतु, घरापासून महामार्गापर्यंत पोहोचेपर्यंत सामान्य माणसाची मोठी कसरत होते. लहान गावात राहणारा असो की जिल्ह्याच्या ठिकाणी तो चकचकीत महामार्गांची चर्चा करीत असला तरी घरासमोरचे खड्डे पाहून खिन्न होतो.
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड सर्व जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यासाठी निधीची तरतूद झालेली आहे. उस्मानाबाद-सोलापूर काम पूर्ण होऊन ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने वाहने धावत आहेत. त्याचवेळी जहिराबादकडे जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचा धुराळा संपता संपत नाही. कामे अर्धवट आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण होतील आणि राष्ट्रीय महामार्ग सेवेत येतील, याबद्दल तूर्त शंका नाही. परंतु त्या महामार्गांपर्यंत पोहोचणारे राज्य रस्ते आणि जिल्हा रस्ते यांची अवस्था दयनीय आहे. सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातूनही गेल्या चार वर्षात रस्त्याची कामे होऊ शकली नाहीत. लातूर-उदगीर रस्त्याची दुरवस्था कायम आहे. हे एक उदाहरण झाले, सबंध राज्यातील बहुतांश राज्य रस्ते याच अवस्थेत आहेत. साधारणत: ९० हजार किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील २५ हजार किलोमीटरचे रस्ते प्रवास करण्याजोगे आहेत तर २५ हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. उर्वरित रस्त्यांमधूनही खड्ड्यांचा अंदाज घेत वाहनधारकांना चालावे लागते. डिसेंबर २०१७ अखेर रस्त्यांवर खड्डे ठेवणार नाही, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, खड्ड्यांनी रस्त्याचा पिच्छा सोडलेला नाही.
जी अवस्था राज्य आणि जिल्हा रस्त्यांची आहे तीच अवस्था नगरपालिका, महापालिका हद्दीतील रस्त्यांचीही आहे. लातूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. एक मुख्य रस्ता वगळता अन्य कुठल्याही रस्त्यावर डांबर आणि सिमेंट ओतलेले दृश्य नाही. कमी-अधिक फरकाने तालुका शहरांच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. जिथे खोदकाम झाले आहे ते जैसे थे आहे. नालीची कामे अर्धवट आहेत. जिथे गरज नाही तिथे नाली केली आहे. शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये शोधावी लागतात. त्यामुळे एकीकडे महामार्गाच्या चकचकीत रस्त्यांचे चित्र आणि दुसरीकडे घरासमोर खड्डेच खड्डे अशी विसंगती दिसत आहे.
राष्ट्रीय महामार्गाची बांधणी हा केंद्र सरकार अखत्यारीत विषय आहे. तिथे निधी मुबलक आहे. कोट्यवधींचे महामार्ग जाहीर होत आहेत. परंतु, भाजपाच्याच ताब्यात असलेल्या नगर पालिका आणि महापालिका निधीअभावी रस्त्यांवरील खड्डेही बुजवू शकत नाहीत. अपवाद एक-दोन रस्त्यांचे काम होत असले तरी लातूरसारख्या महापालिका क्षेत्रात अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत आहेत.