तांबरवाडी, सिकंदरपूर लातूर जिल्ह्यातील 'सुंदर' गावे; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस, ग्रामस्थांत आनंद
By हरी मोकाशे | Updated: December 5, 2024 18:36 IST2024-12-05T18:36:04+5:302024-12-05T18:36:26+5:30
पाहणी व तपासणीअंती मुल्यांकनात औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले.

तांबरवाडी, सिकंदरपूर लातूर जिल्ह्यातील 'सुंदर' गावे; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस, ग्रामस्थांत आनंद
लातूर : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही गावांनी बाजी मारली आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ही दोन्ही गावे स्मार्ट ठरल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही गावात आनंद व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या वतीने आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत सन २०२२- २३ मध्ये तालुकास्तरावर प्रथम आलेल्या जिल्ह्यातील १० गावांची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. यात स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान अशा पाच मुलभूत निकषांप्रमाणे भेटी देऊन कामांची आणि अभिलेख्यांची पडताळणी करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील दहाही गावांचे निकालाकडे लक्ष लागून होते.
समान गुण मिळाल्याने दोन्ही गावे प्रथम...
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत शेलदरा (ता. जळकोट), बामणी (ता. उदगीर), आंबेगाव (ता. देवणी), गणेशवाडी (ता. शिरुर अनंतपाळ), काटेजवळगा (ता. निलंगा), तांबरवाडी (ता. औसा), सिकंदरपूर (ता. लातूर), पोहरेगाव (ता. रेणापूर), तिवघाळ (ता. चाकूर) आणि सताळा (ता. अहमदपूर) या दहा गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी व तपासणीअंती मुल्यांकनात औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले. त्यामुळे या दोन्ही गावांची संयुक्तरिक्त्या जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणून निवड झाली आहे.
प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस...
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुका पातळीवर प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस दिले जाते. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावास ३० लाखांचे पारितोषिक दिले जाते. त्यानुसार तांबरवाडी आणि सिकंदरपूर या दोन्ही गावांना प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
दोन्ही गावांचे उत्कृष्ट कार्य...
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करीत तांबरवाडी आणि सिकंदरपूर या दोन्ही गावांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे समान गुण मिळाले. परिणामी, संयुक्तरित्या दोन्ही गावे जिल्हास्तरावर प्रथम आली आहेत. जिल्ह्यातील इतर गावांनीही अशा पध्दतीने गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा.
- बाळासाहेब वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.