Video: केमिकल घेऊन जाणारा टँकर उलटला, उग्र वासामुळे २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी
By हरी मोकाशे | Published: April 19, 2023 01:33 PM2023-04-19T13:33:43+5:302023-04-19T13:34:22+5:30
कोपरा गावाजवळ वळण रस्ता असल्याने तिथे सातत्याने अपघात होत आहेत.
किनगाव (जि. लातूर) : बडोदा येथून केमिकल भरुन विशाखापट्टनमकडे जाणारा टँकर अहमदपूर तालुक्यातील कोपरा गावानजिकच्या वळणावर बुधवारी पहाटे ५ वा. च्या सुमारास उलटला. त्यामुळे केमिकलची गळती होऊन उग्र वास पसरत धुराचे लोट निर्माण झाले. त्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, या भीतीने प्रशासनाने अपघातस्थळ परिसरातील २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी घातली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही ठार झाला नसून टँकरचालक जखमी झाला आहे.
बडोदा येथून हेक्झा मेथीलिन नावाचे केमिकल घेऊन ट्रँकर (एमएच २०, इजी ८१७६) हा हैदराबादमार्गे विशाखापट्टणमकडे निघाला होता. हा टँकर अहमदपूर तालुक्यातील कोपरा गावाजवळील वळणावर बुधवारी पहाटे आला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर उलटला. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, केमिकलची गळती होऊन उग्र वास येण्यास सुरुवात झाली. तसेच केमिकलकवर पाणी पडल्यास धूर निर्माण होत आहे. उग्र वासामुळे अपघातस्थळानजिकच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास कुठलाही धोका होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक प्रवेश बंद करण्यात आला आहे. दरम्यान, कुठलाही अनर्थ घडू नये म्हणून लातूर, उदगीर व अहमदपूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. हे जवान केमिकलमुळे निर्माण होत असलेला धूर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांनी भेट देऊन पाहणी करीत आवश्यक त्या सूचना केल्या. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अनिलकुमार अंदेलवार, जिल्हा परिषदेचे डॉ. बालाजी बरुरे, सपोनि. भाऊसाहेब खंदारे, तलाठी हंसराज जाधव, मंडळ अधिकारी अण्णासाहेब नागदरे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन तळ ठोकून आहेत.
लातूर: केमिकल घेऊन जाणारा टँकर उलटला, उग्र वासामुळे २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी; अहमदपूर तालुक्यातील कोपरा गावानजिकची घटना pic.twitter.com/kRkP7QoQUu
— Lokmat (@lokmat) April 19, 2023
वळण रस्त्यामुळे सतत अपघात...
कोपरा गावाजवळ वळण रस्ता असल्याने तिथे सातत्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटही बंद आहे. त्यामुळे रात्री अंधार असतो. येथील स्ट्रीट लाईट सुरु करावी. तसेच वळण रस्त्यावर गतिरोधक निर्माण करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
नागरिकांनी घाबरु नये...
उग्र वासामुळे घटनास्थळ परिसरात नागरिकांनी येऊ नये. रस्त्यावर केमिकल सांडले असल्याने रस्ता स्वच्छ केला जात आहे. नागरिकांनी घाबरु नये. सतेच एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून या वळण रस्त्यावर अपघात होऊ नयेत म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या जातील.
- प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार.