'प्रेरणा परीक्षेमुळे मानसिक छळ'; शिक्षक समन्वय समितीचा परीक्षेवर बहिष्काराचा निर्णय

By संदीप शिंदे | Published: June 19, 2023 07:26 PM2023-06-19T19:26:37+5:302023-06-19T19:30:44+5:30

सहविचार सभेत निर्णय, ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Teacher Coordinating Committee's Boycott of Prerana Exam | 'प्रेरणा परीक्षेमुळे मानसिक छळ'; शिक्षक समन्वय समितीचा परीक्षेवर बहिष्काराचा निर्णय

'प्रेरणा परीक्षेमुळे मानसिक छळ'; शिक्षक समन्वय समितीचा परीक्षेवर बहिष्काराचा निर्णय

googlenewsNext

लातूर : जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीची सहविचार सभा सोमवारी पार पडली. शिक्षक प्रेरणा परीक्षेमुळे शिक्षकांचा मानसिक छळ होत आहे. त्यामुळे समन्वय समितीच्यावतीने परीक्षेवर सामूहिक बहिष्कार टाकण्यात येत असून, जिल्ह्यातील एकही शिक्षक परीक्षा देणार नाही निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

बैठकीत एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत कपात करु नये, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते अजूनही दिले नाहीत, जिल्हा परिषद लातूरने यापूर्वी शिक्षकांकडून सहाय्यता निधी म्हणून जमा केलेल्या कुपोषित निधी, बळीराजा सबलीकरण निधी, कोविडनिधी, जिल्हा परिषद जिंदाबाद नाटकाचा निधीची विचारणा करूनही हिशोब दिला नाही. त्यामुळे समन्वय समितीच्या वतीने एक दिवसाच्या पगार कपातीस विरोध करण्यात आला. तसेच विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालय लातूर ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूरपर्यंत 8 जुलै रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले. याबाबत मागण्यांचे निवेदन मंगळवारी देण्याचे ठरविण्यात आले. बैठकीस सुनील हाके, मंगेश सुवर्णकार, शरद हुडगे, प्रल्हाद इगे, गोपाळ पडिले, विजयकुमार गुप्ते, सी.एस.भोजने, एम.आर. खिचडे, माधव गीते, विठ्ठल बडे, सुभाष मस्के, परमेश्वर बालकुंदे, सलीम पठाण, टी.जी. होसुरकर, रमेश मांदळे, बाळासाहेब येळापुरे, मुजीरखान पठाण, जी.पी. कादरी, बाळकृष्ण कासले, विनायक सावंत, नागसेन कांबळे, अरविंद पुलगुर्ले उपस्थित होते.

आंतरजिल्हा बदली पोर्टलवर जागा दाखवाव्यात...
जिल्ह्यातील सहशिक्षकांच्या रिक्त असलेल्या व पदोन्नती नंतर रिक्त होणाऱ्या सर्व जागा आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या भूमीपुत्र शिक्षकांच्या समायोजनानेच भराव्यात. त्यासाठी आंतरजिल्हा बदलीच्या पुढील टप्यात बदली पोर्टलला सर्व रिक्त जागा दाखवण्यात याव्यात. दरमहा पद्धतीने वेतन अदाई करावी. डी.सी.पी.एस. धारक सर्व शिक्षकांच्या स्लिप त्यांचे हिशोब पूर्ण देऊन तात्काळ काढाव्यात. सातव्या वेतन आयोग फरक- सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता ज्या तालुक्यांना देण्यात आला नाही, तो तात्काळ देण्यात यावा आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Teacher Coordinating Committee's Boycott of Prerana Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.