शिक्षक दाम्पत्याने मुलीसह संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:05 PM2024-11-30T16:05:46+5:302024-11-30T16:07:09+5:30

किनीकदू गावात एकही चूल पेटली नाही

Teacher Masanaji Tudame ends life with wife and daughter; Villagers are stunned by the cremation of the three on the same pyre | शिक्षक दाम्पत्याने मुलीसह संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव सुन्न

शिक्षक दाम्पत्याने मुलीसह संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव सुन्न

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील किनीकदू गावचे रहिवासी असलेल्या शिक्षक दाम्पत्याने एका मुलीसह गंगाखेड येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. जवळपास २०० उंबरठ्यांचे गाव असलेल्या त्यांच्या मूळ गावी किनीकदू येथे घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तिघांच्या मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, सकाळी गावात एकही चूल पेटली नाही. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते.

किनीकदू गावचे रहिवासी असलेले मसनाजी तुडमे हे गंगाखेड येथील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यामुळे कुटुंबीयांसह ते गंगाखेड येथेच राहत होते. गुरूवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मसनाजी तुडमे (वय ५३), पत्नी रंजना तुडमे (वय ४५), मुलगी अंजली तुडमे (२२) या तिघांनीही मालवाहतूक रेल्वेखाली गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात आत्महत्या केली. एकाचवेळी तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात मिळताच तुडमे कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली. तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत मूळ गावी किनीकदू येथे आणण्यात आले. ग्रामस्थ व नातेवाईकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तिन्ही जणांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावावर शोककळा...
अहमदपूर तालुक्यातील किनीकदू गावावर घटनेची माहिती मिळताच शोककळा पसरली. शिवाय, गावात अंत्यविधी होईपर्यंत एकही चूल पेटली नाही. शिक्षक दाम्पत्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत सर्वजणच अनभिज्ञ होते.

Web Title: Teacher Masanaji Tudame ends life with wife and daughter; Villagers are stunned by the cremation of the three on the same pyre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.