सातपूते, खलूरे, जगदाळे यांना शिक्षक गुणगौरव पुरस्कार
By संदीप शिंदे | Published: September 1, 2023 11:35 PM2023-09-01T23:35:46+5:302023-09-01T23:36:19+5:30
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष योगदानाबद्दल होणार सन्मान
लातूर : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये नवोपक्रम राबविण्याबरोबरच समाजात वृक्षारोपण, अवयवदान, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष जनजागृती केल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील डॉ. सतीश सातपुते, महादेव खळूरे, प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये लातूरातील शासकीय वसाहतीतील जिल्हा कन्या प्रशालेतील सहशिक्षक डॉ. सतीश नारायणराव सातपुते यांचा समावेश आहे. त्यांनी नवोपक्रम स्पर्धेत सतत पाच वर्षे सहभागी होऊन राज्यस्तरावर पुरस्कार मिळविला. तसेच दीक्षा ॲप्लिकेशन निर्मिती करुन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविला.
कोविड काळात शाळा बंद मात्र, शिक्षण सुुरु निर्मितीत सहभाग घेत शैक्षणिक कार्य केले. शिवाय, सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
अहमदपूरच्या यशवंत विद्यालयातील महादेव खळूरे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव अंतर्गत विशेष कला शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी शासकीय ग्रेड परीक्षा मुल्यमापन केंद्रात पाच वर्षे परीक्षक म्हणून कार्य केले. स्वीप कलापथकाद्वारे मतदार जनजागृती केली. तंबाखुमुक्त शाळा अभियानात तसेच इंधन बचत व उर्जा संवर्धनात उत्कृष्ट कार्य केले. तसेच ज्येष्ठ कलावंत कमिटी व एकल कलावंत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
लातुरातील दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ. संदीपान जगदाळे हे संगीत विषयाचे शिक्षक आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे पाच विद्यार्थ्यांची नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. १९ पुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून, ॲपच्या माध्यमातून मोफत व आनंददायी शिक्षण ते देत आहेत. गौंड आदिवासी वस्तीवर जाऊन त्यांनी तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार दिला जाणार आहे.