शिक्षक गैरहजर असल्याने ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 06:37 PM2018-07-25T18:37:29+5:302018-07-25T18:39:28+5:30
शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली.
उदगीर (लातूर ) : शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, शाळेस दोन्ही शिक्षकांची कायमस्वरुपी नियुक्ती होणार नाही, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, असा पावित्रा घेतला़
उदगीर तालुक्यातील वंजारवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. शाळेत २६ विद्यार्थी असून पूर्वी येथे दोन शिक्षक होते़ शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत येथे एकच शिक्षक रुजू झाला़ त्यानंतर शाळा नियमितपणे शाळा सुरू झाली. दरम्यान, रुजू झालेले शिक्षक संजीव केंद्रे यांचा अपघात झाल्याने ते दीर्घ रजेवर आहेत़ त्यामुळे केंद्रप्रमुखांनी कर्लेवाडी येथील शिक्षक आर.के. वंगरवाड यांची तिथे नियुक्ती केली. आज सकाळी शाळा भरण्याची वेळही होऊन गेली परंतु, संबंधित शिक्षक गैरहजर राहिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन कायमस्वरूपी दोन शिक्षकांची नियुक्ती करणार नाहीत, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला़
११.४५ वा़ शाळेवर हजऱ़़
वंजारवाडीच्या शाळेवर शिक्षक गैरहजर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली़ त्यामुळे मी तात्काळ संबंधित शिक्षकाला बोलून शाळेवर हजर राहण्यास सांगितले. मीसुध्दा ११.४५ वा़ शाळेवर हजर झालो. ग्रामस्थांनी कुलूप काढले नसल्याने दिवसभर त्याठिकाणीच आम्ही थांबलो. यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती दिली असल्याचे केंद्रप्रमुख एन.व्ही. रोकडे यांनी सांगितले़
२.३० वा़ शिक्षक, केंद्रप्रमुख हजऱ़़
सकाळी शिक्षक गैरहजर असल्याचे समजताच गावातील नागरिक शाळेकडे गेले़ संतप्त नागरिकांनी घरचे कुलूप आणून शाळेच्या मुख्य द्वारास व वर्गखोल्यांना ठोकले़ त्यानंतर शाळेसमोर ठिय्या मांडला. दरम्यान, २़३० वा़ केंद्रप्रमुख व शिक्षक शाळेवर आले. या प्रकरणाची वरिष्ठ जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत शाळा उघडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याचे पालक मनोहर यमणर, अभिमान कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांनी दिल्याने जि.प. सदस्या विजयाताई बिरादार, सरपंच शैलजाताई पटवारी यांनी भेट देऊन वरिष्ठांकडे दाद मागू, असे सांगितले. यावेळी राजपाल सुरनर, बालाजी पाटील, देविदास मुंडे, बाजीराव सुरनर, राम सुरनर, नागनाथ सुरनर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.