विविध मागण्यांसाठी शिक्षक दिनी शिक्षकांचे आंदोलन, जिल्हा परिषदेवर धडकली शिक्षकांची रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 07:32 PM2018-09-05T19:32:19+5:302018-09-05T19:32:31+5:30
शहरातील गांधी चौक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय शिक्षक परिषदेसह अन्य संघटनांच्या वतीने शिक्षक दिनी रॅली काढण्यात आली.
लातूर : शहरातील गांधी चौक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय शिक्षक परिषदेसह अन्य संघटनांच्या वतीने शिक्षक दिनी रॅली काढण्यात आली. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या वर्ग, तुकड्यांना प्रचलित नियमाप्रमाणे तातडीने अनुदान मंजूर करावे, यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
यानिमित्त गांधी चौकातील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत शिक्षकांनी रॅली काढली. रॅली दरम्यान शिक्षकांनी भीक मांगो आंदोलन करून आपले निवेदन प्रशासनाला सादर केले. १६ आॅगस्ट २०१२ च्या शासन निर्णयाप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये देण्यात आलेल्या, १४ मार्च २०११, ३ सप्टेंबर २०१३, ८ आॅक्टोबर २०१३, ७ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार मंजूर मात्र जून २०१२ पासून कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मंजूर करावे, या तुकड्यांना चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर मूल्यांकन करणे क्रमप्राप्त होते. पण ते करण्यात आले नाही. ते करावे. प्रचलित नियमाप्रमाणे पाचव्या वर्षी २० टक्के, सहाव्या वर्षी ४० टक्के आणि नवव्या वर्षी १०० टक्के अनुदान देणे क्रमप्राप्त होते. मात्र ते शासनाकडून अद्यापही देण्यात आले नाही.
या तुकड्यांना नियमाप्रमाणे अनुदान द्यावे, यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शामराव लवांडे, विभागीय अध्यक्ष धनंजय उजनकर, शिवकुमार अंबुलगे, ज्ञानेश्वर जाधव, शिवशंकर स्वामी, अशोक नाटकरे, विश्वनाथ खंदाडे, संदीप बिराजदार, विकास भिंगोले, फैय्याज जळकोटे, लक्ष्मण डोंगरे, संतोष साळुंके, दयानंद बानापुरे, दत्तात्रय माने, किशोर गाढवे, गौरव सिंदफळकर, बापूराव रोंगे, ज्ञानेश्वर गजरे, सचिन चव्हाण, कृष्णा हुमनाबादे, फरहाना शेख, शिल्पा मुस्के, अरुणा कांदे, निखिल घोडके, ज्योती गुंजोटे, राघवेंद्र बोरोळे आदींसह जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.
निलंग्यात काळ्या फिती लावून आंदोलन...
निलंगा येथे शिक्षक समिती तसेच शिक्षक सहकार संघटनेने विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले. डीसीपीएस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या विरोधात काळ्या फिती लावून शिक्षकांनी निषेध नोंदविला. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष अरुण साळुंके, संजय कदम, बालाजी येळीकर, गणेश गायकवाड, तानाजी सूर्यवंशी, सहदेव माने, सुनील टोंपे, भास्कर सोळुंके, संजय सूर्यवंशी, चंद्रकांत गेंटेवाड, विष्णू धुमाळ, सुरेश जाधव, कृष्णा पेंटेवाड, माऊली मारकवाड, आदींची उपस्थिती होती.