लातूर जिल्हा परिषदेसमोर प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन
By संदीप शिंदे | Published: August 22, 2022 04:32 PM2022-08-22T16:32:59+5:302022-08-22T16:33:20+5:30
शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या, आदी घोषणा देत शिक्षकांनी केले आंदोलन
लातूर : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक संघटना महासमनव्य समितीच्यावतीने आज दुपारी दोन वाजेपासून जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या, रिक्त पदे पदोन्नतीने तत्काळ भरण्यात यावीत, कुपोषण निर्मूलन निधी संकलनाचा हिशेब देण्यात यावा, सातव्या वेतन आयोगातील सर्व थकीत हफ्ते जमा करावेत, एनपीएस धारकांचे रोखीने देण्यात यावे, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी, शालेय पोषण आहाराचे स्वतंत्र लेखापरीक्षण रद्द करावे, व्हाट्सअप्प वरील सूचना व आदेश तात्काळ बंद करावेत, शाळेचे विद्युत देयक जिल्हा परिषद शेष फंडातून भरावे, शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश निधी उपलब्ध करून द्यावा, दर तीन महिन्याला शिक्षक संघटनेची बैठक घेऊन इतिवृत्तची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील सर्व केंद्रिय शाळांना संगणक संच, प्रिंटर शेष फंडातून देण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात लातूर जिल्हा परिषद शिक्षक संघटना महासमनव्य समितीचे केशव गंभीरे, सुनीलकुमार हाके, मच्छिंद्र गुरमे, सुभाष मस्के, अण्णासाहेब नरसिंगे, चंदू घोडके, तानाजी सोमवंशी, हिरालाल पाटील, ज्ञानेश्वर जाधव, बालासाहेब कदम, जे.जे. गायकवाड, मंगेश सुवर्णकार, माधव गीते, सलीम पठाण, उत्तम कठाळे आदींसह जिल्ह्यातील शिक्षक सहभागी होते.