शाळांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचा आक्रोश माेर्चा
By हरी मोकाशे | Published: October 2, 2023 06:48 PM2023-10-02T18:48:36+5:302023-10-02T19:03:33+5:30
शासन धोरणाविरोधात घोषणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
लातूर : शाळांचे खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या विरोधात आणि राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौकातून आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. त्यात राज्य उपाध्यक्ष डी.बी. गुंडुरे, विजयकुमार गुत्ते, नरसिंग घोडके, नरेश थोरमोटे, एम.एम. जाधव, डी.एस. धुमाळ, राजेसाहेब थळकर, रमेश गोमारे, पांडुरंग पवार, राहुल देशमुख, शिवदास शिंदे, राजेश्वर शिंदे, मधुकर माने, व्यंकट काकडे, बी.एस. साेनटक्के, बालाजी पाटील, भरत बिरादार, बालाजी भांगे, वीरभद्र देशमुख, महादेव होनराव, बालाजी बेरकिळे, कालिदास माने, शिवाजी साखरे, यु.डी. गायकवाड, उजनकर, विश्वंभर भोसले, चंद्रकांत भोजने, नरिसंगे आदी सहभागी झाले होते.
खाजगीकरण थांबवा - जि.प. शाळा वाचवा...
मोर्चा दरम्यान खाजगीकरण थांबवा- जि.प. शाळा वाचवा, कंत्राटीकरण थांबवा- सरकारी नोकऱ्या वाचवा, विकू नका शाळा - घोटू नका गरीबांचा गळा अशा घोषणा देण्यात आल्या. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत. सरकारी व अनुदानित शाळा खाजगी कंपन्यांना देऊ नये. शिक्षक कर्मचारी भरतीचे अधिकार खाजगी कंत्रांटदारांना देऊ नये. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा ३७ मागण्या करण्यात आल्या.