वळण रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: August 22, 2024 16:07 IST2024-08-22T16:07:42+5:302024-08-22T16:07:59+5:30
जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील घटना

वळण रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
कोळनुर : येथील वळण रस्त्यावर उदगीरकडे जाणारी दुचाकी आणि उदगीरहून जळकोटकडे दुध घेऊन जाणाऱ्या टेम्पोंचा गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मुबारक बशीरसाब बागवान (वय ३५ रा. जळकोट) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, मुबारक बागवान हे एमएच २४ बीटी ०१०२ क्रमांकाच्या दुचाकीवरुन उदगीरकडे गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास निघाले होते. याचेळी उदगीरहून जळकोटकडे दूध घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एमएच १२ टीव्ही २३०६ ची कोळनूर येथील वळण रस्त्यावर समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीस्वार मुबारक बशीरसाब बागवान यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेच्या माहिती मिळताच पोलीसांनी बचावकार्य केले. दरम्यान, अपघातप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश मिटकरी करत आहेत.