विनापरवाना ११५ शेळ्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
By संदीप शिंदे | Published: February 29, 2024 05:18 PM2024-02-29T17:18:52+5:302024-02-29T17:19:13+5:30
२० लाखांचा मुद्देमाल जप्त : औराद शहाजानी पोलिसांची कारवाई
औराद शहाजानी : येथील महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर बेकायदेशीरपणे ११५ शेळ्यांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या टेम्पाेस औराद शहाजानी पोलिसांनी पकडले असून, चार जणांना ताब्यात घेतले आहे. टेम्पोमधील शेळ्यांची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी वैद्यकीय तपासणी करून पाेलिस संरक्षणात एका शेडमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शेळ्या हस्तांतरित करण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
औराद शहाजानी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील व्यापारीपेठ असलेले गाव असून, येथून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, व आंध्रप्रदेश या राज्यात जाणारा गुटखा, वाळू, अवैध पुशधनाची वाहतूक होते. नुतन सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत ३७ गावांत दारुबंदी करुन ३३ कारवाया केल्या आहेत. यातच सीमेचा फायदा घेणाऱ्या लाेकांचा बंदोबस्त करण्यासाठी चेक पाेस्ट लावून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
मंगळवारी सायंकाळी विनापरवाना ११५ शेळ्या घेऊन टेम्पो (टीएस १२ युबी ६९५०) दुसऱ्या राज्यात जात असल्याचे निदर्शनास आल्यावर चौकशी करण्यात आली. यावेळी टेम्पोत असलेल्या आंध्रप्रदेश व कर्नाटकमधील प्रत्येकी दोघांना ताब्यात घेऊन नाेटीस देऊन सोडण्यात आले. तसेच टेम्पोमधील ११५ शेळ्या सावरी येथील एका खाजगी शेडमध्ये पालन-पोषण करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या शेळ्यांची काळजी पाेलिस कर्मचारी, पाेलिस पाटील घेत आहेत. ११५ मेंढ्यांची किंमत १० लाख ३५ हजार तर १० लाखांचा टेम्पो असा एकूण २० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास औराद शहाजानी पोलीस करीत आहेत.