रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून टेम्पोची धडक; दोघांचा मृत्यू
By आशपाक पठाण | Updated: April 3, 2025 22:59 IST2025-04-03T22:59:03+5:302025-04-03T22:59:12+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड नजीकची घटना

रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून टेम्पोची धडक; दोघांचा मृत्यू
आशपाक पठाण
बेलकुंड (जि. लातूर) : राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकची दुरुस्ती सुरू असताना पाठीमागून आलेल्या एका आयशर टेम्पोने या ट्रकला जोराची धडक दिली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील बेलकुंड नजीक घडली.
तुळजापूरच्या दिशेने निघालेली ट्रक (एमएच २६ बीई ७२१२) राष्ट्रीय महामार्गावर अचानक बंद पडली. त्याची दुरुस्ती सुरू असताना पाठीमागून कोथिंबीर घेऊन निघालेल्या आयशर टेम्पो (क्र. एमएच २५ पी ३७३७) ची जोरदार धडक बसली. यात ट्रक दुरुस्तीचे काम करीत असलेला क्लिनर रफिक शेख (रा. थोडगा, ता. अहमदपूर), टेम्पो चालक दत्ता सावंत (रा. आशिव, ता. औसा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास कोथिंबीर वाहतूक करणाऱ्या अपघातग्रस्त टेम्पोला पाठीमागून आलेल्या एमएच ०२ डीजे २२८८ या कारची धडक बसली. यात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. या अपघातामुळे तुळजापूरकडे जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
ग्रामस्थांची अपघातस्थळी धाव
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर बेलकुंड नजीक अपघात झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रिमझिम पाऊस सुरू असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी मदत केली. घटनास्थळी भादा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महावीर जाधव यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली.