बामणी येथील खूनप्रकरणी दहा आराेपींना जन्मठेपेची शिक्षा

By राजकुमार जोंधळे | Published: July 4, 2024 10:28 PM2024-07-04T22:28:43+5:302024-07-04T22:28:59+5:30

निलंगा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Ten accused sentenced to life imprisonment in Bamni murder case | बामणी येथील खूनप्रकरणी दहा आराेपींना जन्मठेपेची शिक्षा

बामणी येथील खूनप्रकरणी दहा आराेपींना जन्मठेपेची शिक्षा

राजकुमार जोंधळे / निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील बामणी येथे एकाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. दरम्यान, या मृत्यूस कारणीभूत ठरवत दहा आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

निलंगा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी बापू ऊर्फ विजय ढाले, हाणमंत माणिक गायकवाड, राम गायकवाड, गोरख गायकवाड, अरविंद गायकवाड, शशिकांत गायकवाड, मल्लारी गायकवाड, दिगंबर गायकवाड, शंभू गायकवाड आणि शाम गायकवाड याच्याविराेधात कलम ३०२, १४३, १४७, १४९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला हाेता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक अनिल चोरमोले यांनी केला. निलंगा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी सुनिता अर्जुन रणदिवे यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, त्यांचा भाऊ विक्रम विठोबा शिंदे याच्यासोबत काही आरोपीचे मोबाईलवर घरासमोर कॅनलवर बसून माेठ मोठ्याने बोलणे, ओरडणे, हसण्यावरून वाद झाला हाेता. १९ आक्टोबर २०२१ रोजी फिर्यादीचा भाऊ जगन्नाथ विठोबा शिंदे हा रात्री बामणी येथील घरी हाेता. 

एका आरोपीने त्यांना घराबाहेर बाेलावून घेतले. ताे घराबाहेर गेल्यावर मागील भांडणाची कुरापत काढून राम याने जगन्नाथ यांना चापट मारली आणि बापू ढाले यांनी भावाच्या डोक्यात पाठीमागून काठी घातली. त्यात ते जखमी झाले. भावाच्या मानेजवळ दगड मारला आणि इतरांनी काठी, दगड फेकून मुलगी स्नेहा, आई, वडिलांनाही दगडफेकीत मार लागला. डॉक्टरांनी तपासून जगन्नाथ विठोबा शिंदे यांना मृत घाेषित केले. याबाबत निलंगा ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता.

निलंगा न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून दहा आरोपींना कलम ३०२ सह १४९ प्रमाणे दोषी धरत जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.

कलम १४३ नुसार दोन महिने, कलम १४७ नुसार चार महिने, १४८ नुसार चार महिने आणि ३०० रुपये प्रत्येकी दंड, कलम ३२३ नुसार दोन महिने, कलम ३२४ नुसार चार महिने आणि ५०४ नुसार चार महिने अशी एकाचवेळी शिक्षा सुनावली. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील कपिल पंढरीकर यांनी पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी वकील एल. यू. कलकर्णी यांनी मदत केली तर काेर्ट पैरवी डी.एन. गुडमेवाड यांनी केली.

Web Title: Ten accused sentenced to life imprisonment in Bamni murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.