सात वर्षांमध्ये दहा तहसीलदार बदलले; २३ काेटींच्या अपहाराची कोणास आली नाही कुणकुण!
By राजकुमार जोंधळे | Published: January 23, 2023 08:16 PM2023-01-23T20:16:16+5:302023-01-23T20:16:45+5:30
लिपिकांचा पराक्रम पण आराेपींचा आकडा वाढण्याची शक्यता...
- राजकुमार जाेंधळे
लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात महसूल सहायकाने केलेल्या तब्बल २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या रकमेचा अपहाराचा धक्कादायक प्रकार रविवारी समाेर आला. गत सात वर्षांमध्ये एकूण दहा तहसीलदार बदलले. मात्र, या काेट्यवधींच्या अपहाराची साधी कुणकुण संबंधित यंत्रणेला लागली नाही, हेच माेठे आश्चर्य आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, अपहाराच्या रकमेचा अन् आराेपींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पाेलिसांनी सांगितले, मनाेज नागनाथ फुलेबाेयणे (रा. बाेरी, ता. लातूर) हा जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा शाखा विभागात लिपिक, महसूल सहायक अव्वल कारकुन पदावर कार्यरत हाेता. त्याच्याकडे विविध प्रकारच्या खरेदीची, विविध शाखा, पुरवठादार यांच्याकडून येणारी देयके तपासून सक्षम प्राधिकार यांच्या मान्यतेने संबंधितांना देयकाचे धनादेश देणे, आरटीजीएस करण्यासाठी बॅंक व्यवस्थापकास निर्देशनपत्र देणे, नाेंदवहीमध्ये नाेंद घेणे, बॅंक व्यवहार हाताळणे आदी जबाबदारी हाेती. मात्र, मनाेज फुलेबाेयणे याने २६ मे २०१५ ते ८ जून २०२२ या कालावधीत बनावट आरटीजीएस तयार करून, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे धनादेशातील मूळ रकमेच्या आकड्यात स्वहस्ताक्षरात वाढ करून, असे आरटीजीएस, धनादेश स्वत:च्या, मित्राच्या बॅंक खात्यात जमा केले. तब्बल २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली. आता काेट्यवधींच्या अपहार कथा तपासात समाेर येत आहेत.
एका लिपिकाचा ‘काेट्यवधीं’चा खेळ...
लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून एवढा माेठा अपहार हाेताे, हेच अविश्वसनीय आहे. आता त्याने हा अपहार कसा अन् काेणत्या पद्धतीने केला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात किती संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे? हेही तपासात उघड हाेणार आहे. सात वर्षे अपहार उजेडात कसा येत नाही? या प्रश्नाने पाेलिसांनाही चक्रावून टाकले आहे.
धनादेश न वटल्याने फुटले बिंग...
२९ मे २०१५ राेजी मनाेज फुलेबाेयणे हा जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात रुजू झाला. त्यानंतर ८ जून २०२२ राेजी त्याची औसा येथील तहसील कार्यालयात बदली झाली. ताे औसा येथे गेल्यानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या बॅंक खात्यातून ९६ हजार ५५९ रुपये काढण्याबाबत धनादेश पाठविण्यात आला. मात्र, खात्यावर आवश्यक ती रक्कम नसल्याने ताे धनादेश वटला नाही. परिणामी, बॅंकेच्या खात्याचे विवरणपत्र (स्टेटमेंट) काढले असता, २३ काेटींच्या अपहाराचे बिंग फुटले.