भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटून कंटनेर उलटल्याने तिघांचा चिरडून मृत्यू
By संदीप शिंदे | Published: February 1, 2024 04:27 PM2024-02-01T16:27:31+5:302024-02-01T16:28:18+5:30
निलंगा तालुक्यातील झरी गावाजवळील घटना
निलंगा (जि. लातूर) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटून दोन महिलांसह एका युवकाचा त्याखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना निलंगा-उदगीर राज्य मार्गावरील झरी गावानजिक गुरुवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी रक्तच रक्त दिसून येत होते. त्यामुळे अंगावर शहारे येत होते. कृष्णा अर्जुन जाधव (वय १९), कस्तुरबाई परमानंद जाधव (वय ३६) व अक्षरबाई किशनराव सूर्यवंशी-मिरकलकर (वय ५०) अशी मयत तिघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, साकोळ-जवळगा येथून गुरुवारी पहाटे कंटेनर (डीडी ०१ आर ९०७१) निलंग्याकडे येत होता. हा कंटेनर निलंगा-उदगीर राज्यमार्गावरील झरी गावानजिक आला असता अचानकपणे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर उलटला.
दरम्यान, कंटेनर जवळून कृष्णा जाधव व त्याची चुलती कस्तुरबाई जाधव हे दोघे दुचाकी (एमएच २४ बीव्ही २३७१) वरुन शेताकडे निघाले होते. तर गावातील अक्षरबाई सूर्यवंशी-मिरकलकर ह्या पायी जात होत्या. तेव्हा त्यांच्यावर कंटेनर उलटल्याने तिघांचाही जागीच चिरडून मृत्यू झाला. दुचाकीचा तर चक्काचूरच झाला. या अपघातात कंटेनर चालक माधव प्रभू घोडके (वय ४० रा. जवळगा) गंभीर जखमी झाला असून, त्यास निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस पाटील सत्यनारायण पाटील, गजानन पाटील, तानाजी बिराजदार, दिनकर पाटील, सुरेश चव्हाण, संजय खोत, महादेव खोत, राज बिराजदार आदींसह नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. अपघात स्थळास निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ यांनी भेट देऊन पंचनामा केला असून, कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातामुळे तीन तास वाहतूक ठप्प...
कंटेनर राज्यमार्गावरच उलटल्याने जवळपास तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने २ क्रेन व एका जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याच्या बाजुला सारुन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मयतांचे शवविच्छेदन निलंगा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, झरी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.