ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; जखमी पाेलिस अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Published: October 9, 2023 07:38 PM2023-10-09T19:38:03+5:302023-10-09T19:38:23+5:30
लातूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपळफाटा येथे झाला होता अपघात
रेणापूर (जि. लातूर) : लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील पिंपळफाटा येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ट्रॅक्टर आणि कारच्या भीषण अपघातात जखमी झालेले राज्य राखीव पोलिस दलातील पाेलिस उपनिरीक्षक लक्ष्मण शिवराम खरात यांचे एका खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान शनिवारी निधन झाले. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात घटनेची अद्यापही नाेंद झाली नव्हती.
लातूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपळफाटा येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लातूरकडून येणाऱ्या ट्रॅक्टर आणि अंबाजोगाईच्या दिशेने जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये (एम.एच. २४ ए.डब्ल्यू ५९७७) क्रमांकाच्या कारचे मोठे नुकसान झाले, तर ट्रॅक्टरचे बोनट कारमध्ये घुसल्याने यात कारचालक लक्ष्मण शिवराम खरात (वय ३९, रा. शेंडगा, ता. गंगाखेड, ह.मु. लातूर) हे जखमी झाले होते. त्यांना रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते. पुढील उपचारासाठी लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा दाखल केले. मात्र, शनिवारी संध्याकाळी डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले.
एक महिन्यापूर्वीच धुळ्याला झाली होती बदली...
मयत लक्ष्मण खरात हे लातूर बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयात पाेलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत हाेते. त्यांची धुळे येथे एक महिन्यापूर्वीच राज्य राखीव पोलिस दलात बदली झाली होती. शुक्रवारी ते धुळ्यावरून लातूरकडे कुटुंबीयांना भेटण्यासाठी येत होते.
शेंडगा गावात झाले अंत्यसंस्कार...
शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रेणापूर-पिंपळफाटा येथे कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शेंडगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.