२२९८ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये आढळले ३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:42+5:302021-07-23T04:13:42+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ९१४ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ९१४ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १३८४ जणांची रॅपिड अंतिजन टेस्ट करण्यात आली. त्यात सहा बाधित आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून नव्या ३० रुग्णांची भर पडली आहे. प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिटिव्हिटी रेट २.६ टक्के असून रॅपिडचा पॉझिटिव्हिटी रेट ०.४ टक्के आहे. प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून २३ जणांना सुट्टी देण्यात आली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसांवर गेला आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र गेल्या काही महिन्यांपासून २.६ टक्के आहे. संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आतापासूनच तयारी करण्यात येत असून दररोज चाचण्या वाढविल्या जात आहे. दीड ते दोन हजारांच्या पुढे चाचण्या करण्यात येत असून आरोग्य सुविधाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट सध्याही तीन टक्क्यांच्या खाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. कोरोना संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे अनुपालन करावे. नियमित मास्क घालावा. सुरक्षित अंतर राखावे. वारंवार हात धुवावा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.