लातुरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन; आ. धिरज देशमुख यांनी साधला संवाद
By संदीप शिंदे | Published: March 20, 2023 05:22 PM2023-03-20T17:22:26+5:302023-03-20T17:22:35+5:30
जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संपात सहभागी राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
लातूर : जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी आंदाेलनाचा सातवा दिवस असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे थाळीनाद आंदोलन केले.
जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संपात सहभागी राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सुरुवात केल्याबद्दल शासनाचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बी .बी. गायकवाड, निमंत्रक संजय कलशेट्टी, संस्थापक अध्यक्ष आर. एस. तांदळे, जिल्हा कार्याध्यक्ष महादेव पांचाळ, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष संतोष माने, सचिव धुमाळ, तलाठी महासंघ जिल्हाध्यक्ष महेश हिप्परगे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अरविंद कुलगुर्ले, माहिती व जनसंपर्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक माळगे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे दत्तात्रय सूर्यवंशी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मस्के, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाई श्रृंगारे, संजीव लहाने, सुदेश परदेशी, मनोज बनकर, हनमंत नागिमे, बालाजी फड, बालकराम शिंदे, मंगेश पाटील, प्रथमेश वैद्य, उमेश सांगळे, अशोक किनीकर, संजय जाधव, सुमित्रा तोटे, सय्यद वाजीद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
आ. धीरज देशमुख यांचा संपास पाठिंबा...
जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु असलेल्या आंदोलनास सोमवारी लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांनी भेट देत पाठिंबा दिला. शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी लातूरचा सुपूत्र म्हणून याठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे यावेळी ते म्हणाले.